रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा-बायकोची उडाली झोप; मोबाईलमुळे सुखी संसारात 'महाभारत'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 03:20 PM2022-07-07T15:20:47+5:302022-07-07T15:37:44+5:30
या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे.
गडचिराेली : पती-पत्नीचे नाते म्हणजे स्नेहाचे, साैख्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे आहे. मात्र, आधुनिक काळात व्हाॅट्सॲप, फेसबुक या साेशल मीडियाचा वापर प्रचंड वाढल्याने तसेच रात्री हाेणाऱ्या चॅटिंगवर काही पती-पत्नींमध्ये भांडणे हाेत आहेत. विशेष करून दिवसापेक्षा ही भांडणे रात्री हाेत असल्याने त्यांची झाेपही उडत आहे.
एकमेकांवर १०० टक्के विश्वास ठेवून संसारात वाटचाल करणाऱ्या जाेडप्यांचे जीवन सुखी राहते. मात्र, स्मार्टफाेन हाती आल्यापासून काही ठिकाणी पत्नी तर काही ठिकाणी पती रात्रीच्या सुमारास चॅटिंग करीत असल्याने दाेघांमध्ये भांडणे हाेतात.
या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे. संशयवृत्तीतूनच दाेघांमध्ये खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून पती-पत्नी नाेकरी किंवा व्यवसायानिमित्त वेगवेगळे राहत असल्यास अशा कुटुंबांमध्ये अधिकच गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सधन कुटुंबीयांमध्येच साेशल मीडियाच्या अतिवापरावरून भांडणे हाेत असल्याचे पुढे येत आहे.
पती-पत्नीच्या वादाला मोबाइल हेच कारण
- माेबाइलवरून संभाषणासाेबतच व्हाॅट्सॲप चॅटिंग ही गाेष्ट सर्रास झाली आहे.
- हाच माेबाइल व ही चॅटिंग पती-पत्नीच्या वादाचे माेठे कारण आहे.
वर्षभरात अल्प तक्रारी
पती-पत्नींमध्ये साेशल मीडियाच्या वापरावरून वाद हाेत असल्याच्या वर्षभरात पाेलीस प्रशासनाकडे पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी शहरी भागातूनच आल्या आहेत.
सोशल मीडियामुळे नवरा-बायकोतील संवाद संपला
फेसबुक, व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्रामच्या अतिवापरामुळे पती-पत्नी दाेघेहीजण आपल्याच विश्वात मग्न असतात. साेशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवरा-बायकाेतील संवाद संपल्याचे दिसून येते. पूर्वीसारख्या गप्पा-गाेष्टी आता हाेत नाही. उरलेला वेळ टीव्हीसमाेर घालविला जाताे.
रात्री मोबाइलपासून दूर राहिलेलेच बरे
- पती-पत्नी दाेघेहीजण दिवसभर कामात व्यस्त राहतात.
- सायंकाळी व रात्री एकमेकांशी गप्पा-गाेष्टी करणे आवश्यक आहे. यासाठी माेबाइलपासून दूर राहावे.
बायको वेळच देत नाही...
संसारिक जबाबदारी, राेजगार, कामे व इतर बाबींमुळे पती-पत्नी प्रचंड व्यस्त असतात. असे असले तरी दाेघांनीही एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांच्यातील संवाद संपुष्टात येऊन मनभेद व मतभेद वाढण्याची शक्यता अधिक असते.
नवरा वेळच देत नाही...
दिवसभर नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पती बाहेर असला तरी चालते. मात्र, सायंकाळपासून सकाळपर्यंत घरी राहून त्याने पत्नीशी हितगुज करणे आवश्यक आहे. पतीने तिला वेळ दिला पाहिजे.