केंद्राच्या योजना गावांत नेणार
By admin | Published: August 2, 2015 01:37 AM2015-08-02T01:37:08+5:302015-08-02T01:37:08+5:30
केंद्र सरकारची अटल पेंशन योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना आदी योजना ..
अहेरीत बँक अधिकाऱ्यांची झाली बैठक : शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
अहेरी : केंद्र सरकारची अटल पेंशन योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना आदी योजना बँकांमार्फत दुर्गम व अतिदुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. अहेरी पंचायत समितीच्या सभागृहात ३० जुलै रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अग्रणी बँकेचे प्रबंधक शिरसीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून नाबार्डचे जिल्हा प्रमुख कृष्णा कोल्हे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक व्ही. पी. मेश्राम, अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस आदी उपस्थित होते.
यावेळी अभियान राबवून केंद्राच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्राकडून चालविल्या जाणाऱ्या योजनांसह १ लाख ते २५ लाख रूपयांचे कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. भारतीय जीवन विमा निगमच्या वृद्धपकाळातील पेंशन योजनेसह अन्य योजनांची माहिती देण्यात आली. कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, वराहपालन व्यवसायाकरिता लाभार्थ्यांना सहाय्य करण्याबाबत चर्चा झाली.
कार्यशाळेला तालुक्यातील बँक आॅफ महाराष्ट्राच्या १२ शाखांचे अधिकारी, बँक आॅफ इंडिया अहेरीचे शाखा व्यवस्थापक ब्रम्हपुरीकर, ए. आर. खान, बेझनवार, भोगावार, संग्रामशाह, बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बँक आॅफ महाराष्ट्र अहेरी शाखेचे व्यवस्थापक संजीवकुमार यांनी केले. तर आभार आर. वाय. सोरते यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)