चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्ते बकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:49 AM2018-07-11T00:49:17+5:302018-07-11T00:50:05+5:30

चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाले असल्याने चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे चामोर्शीवासीय कमालीचे त्रस्त आहेत.

Central roads in Chamorshi city | चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्ते बकाल

चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्ते बकाल

Next
ठळक मुद्देडांबरी रस्त्यांवर पसरला चिखल : अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याचा परिणाम, नवीन मुख्याधिकाऱ्यांपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाले असल्याने चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे चामोर्शीवासीय कमालीचे त्रस्त आहेत.
चामोर्शी शहरातील शिवाजी ते बायपासकडे जाणाऱ्या मार्र्कंडादेव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची चाळणी झाली आहे. या मार्गावरून मार्र्कंडादेव येथे जाण्यासाठी भाविकांची वर्दळ राहते. सदर मार्ग डांबरी असला तरी डांबर शोधणे कठीण झाले आहे. ठिकठिकाणी गिट्टी व रेती बाहेर पडली आहे. कच्च्या मार्गाप्रमाणे सदर मार्ग दिसत आहे. बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे चुकवून वाहन पुढे नेताना वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयाकडे जाणाºया बायपास रस्त्यावर बीएसएनएल कार्यालयाजवळ रस्त्यावरील डांबर उखडला आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने डबके निर्माण झाले आहे.
तहसील कार्यालयाकडे जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग म्हणून नागरिक या मार्गावरून ये-जा करीत असतात. आष्टी कॉर्नर ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत शहरातील एकमेव मुख्य मार्ग असून या रस्त्यावर बसस्टँड, लक्ष्मी गेट, पशु वैद्यकीय दवाखान्याजवळ खड्डे पडले आहेत. पंचायत समिती कार्यालयाशेजारी दुकानगाळ्यांसमोर नाली नसल्याने पावसाचे पाणी दुकानगाळ्यांसमोर साचून राहते. या साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे.
गतिरोधकांमुळे अपघात वाढले
चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर प्रत्येकी जवळपास १०० फूट अंतरावर ठिकठिकाणी गतिरोधक बांधण्यात आले आहेत. मात्र गतिरोधकाच्या नियमानुसार गतिरोधक बांधले नाही. गतिरोधक बांधतांना विशिष्ट उतार देणे आवश्यक असताना एकदम चढभाग ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनाचे इंजिन गतिरोधकाला लागते. त्यामुळे वाहन क्षतिग्रस्त होत आहेत. त्याचबरोबर एकाचवेळी वाहन वर चढल्याने एकदम मोठा धक्का वाहनचालकाला बसतो. वाहनचालकाचे लक्ष नसल्यास व एकाचवेळी वाहन गतिरोधकाला धडकते. त्यामुळे वाहनचालक वाहनासह कोसळत आहेत. चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बनविल्याने अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे.
गुरुवारी चामोर्शी येथे आठवडी बाजार भरतो. या बाजाराला ग्रामीण भागातून हजारो नागरिक येतात. आठवडी बाजार शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते गर्दीने फुलून जातात. वाहनांचीही गर्दी वाढते. यामुळेही अपघात वाढले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असताना नगर पंचायतीने दुरूस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यांचे हाल झाले आहेत. याचा त्रास नागरिकांना होत आहे.

Web Title: Central roads in Chamorshi city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस