केंद्र शाळेची इमारत जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:37 AM2017-09-29T00:37:07+5:302017-09-29T00:37:22+5:30
तालुका मुख्यालयात १०० वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. ही इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून ती केव्हाही कोसळू शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुका मुख्यालयात १०० वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. ही इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून ती केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे या इमारतीच्या जागी दुसरी नवीन इमारत बांधावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील जि. प. केंद्र शाळेच्या जुन्या इमारतीत वर्ग भरविले जात नसले तरी विद्यार्थ्यांना दुसºया खोल्यांमध्ये जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन वर्गखोल्या तसेच शौचालयाची निर्मिती करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. जुन्या इमारतीची निर्मिती १९१५ मध्ये करण्यात आली. सध्या या इमारतीला १०२ वर्ष पूर्ण झालेले आहेत. शाळेत जुन्या दोन इमारती असून त्या मोडकळीस आल्या आहेत. यातील नऊ वर्गखोल्या वापरात आहेत. जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजीची असलेल्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या नऊ वर्ग तुकड्यांमध्ये २८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथे १२ वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन नवीन इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.
शौचालयाअभावी विद्यार्थ्यांची कुचंबना
शाळेत दोन शौचालय असून ते विद्यार्थिनींसाठी आहेत. शासनाच्या नियमानुसार पुन्हा सहा शौचालयाची आवश्यकता आहे. नवीन शाळा इमारतीसह शौचालयाचे बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध करावा, अशी मागणी शाळा समिती अध्यक्ष साईनाथ बुरांडे, उपाध्यक्ष सोनाली संगीडवार, मुख्याध्यापक मारटकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.