पूर्व विदर्भातील पूरपरिस्थितीची केंद्रीय पथक करणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 08:30 AM2020-09-10T08:30:47+5:302020-09-10T08:31:11+5:30
पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी गावात आणि शेतात शिरल्याने सर्वत्र हाह:कार उडाला. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी येत्या ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान केंद्रीय पथक येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी गावात आणि शेतात शिरल्याने सर्वत्र हाह:कार उडाला. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी येत्या ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान केंद्रीय पथक येणार आहे.
एक पथक चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर दुसरे पथक नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्याला भेटी देईल. पूरपरिस्थितीमुळे झालेल्या विविध प्रकारच्या नुकसानाची हे पथक पाहणी करणार आहे. त्यात केंद्र शासनाच्या विविध विभागातील सहसचिव, संचालक यांचा समावेश राहील.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील गावांना भेटी देवून शेतीचे, घरांचे तसेच इतर सार्वजनिक मालमत्तेचे किती नुकसान झाले त्याचे हे पथक प्रत्यक्ष गावात जावून पाहणी करून आढावा घेणार आहे. सद्या कोरोना स्थितीमुळे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या पथकाच्या भेटीदरम्यान गावस्तरावर नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
केंद्रीय पथक काही गावांमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष पूरबाधितांच्या शेतात, घरात जाऊन संवाद साधतील. गावस्तरावर फक्त सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना पथक दाखल झाल्यानंतर उपस्थित राहावे लागणार आहे. अजून नुकसानीचे पंचनामे सुरूच आहेत.