वाघाला जेरबंद करण्यासाठी केंद्राच्या दाेन चमू गडचिरोलीत दाखल हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:46 AM2021-09-16T04:46:02+5:302021-09-16T04:46:02+5:30
वाघाच्या दहशतीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी भयभीत झाले असून, त्यांना शेताकडे जाणेही कठीण झाले आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त न ...
वाघाच्या दहशतीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी भयभीत झाले असून, त्यांना शेताकडे जाणेही कठीण झाले आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. या गंभीर बाबींची दखल घेऊन परिसरातील नरभक्षक वाघांना पकडावे अथवा ठार मारण्याची परवानगी देण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी १५ सप्टेंबर रोजी केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्याकडे दिल्ली येथे भेटी दरम्यान केली. तसेच याबाबत त्वरित आदेश काढण्याची मागणी रेटून धरली. या मागणीची दखल घेऊन केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी या वाघांना जेरबंद करण्यासाठी केंद्राच्या दाेन टीम पाठविण्यात येणार आहेत, असे आश्वासन दिले. कोणत्याही परिस्थितीत नरभक्षक वाघांना तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश ना. चाैबे यांनी प्रशासनाला दिले.
याप्रसंगी वन, पर्यावरण जलवायू परिवर्तन विभागाचे सचिव रामेश्वर प्रसाद गुप्ता उपस्थित हाेते.
नरभक्षक वाघांना पकडण्यासाठी केंद्राच्या वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूटकडून २ चमू त्वरित रवाना करण्याचे आश्वासन ना. अश्विनी कुमार चौबे यांनी खा. नेते यांना या वेळी दिले.