सीईओ दुर्गम भागात पोहोचले
By admin | Published: May 19, 2017 12:20 AM2017-05-19T00:20:27+5:302017-05-19T00:20:27+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी गुरूवारी अतिदुर्गम व नक्षलप्रभावित
मूलभूत समस्या जाणल्या : ग्रामस्थ व पत्रकारांशी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी गुरूवारी अतिदुर्गम व नक्षलप्रभावित तसेच शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची तालुक्यातील अतिदुर्गम गावांना भेटी देऊन तेथील मूलभूत समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी ग्रामस्थ व पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल हे कोरची मुख्यालयापासून २५ ते ३० किमी अंतरावरील अतिदुर्गम बिजेपार, जामनारा, लेकुरबोडी, बोदालदंड, बेडगाव या गावांना भेटी दिल्या. सदर गावातील पिण्याच्या पाण्याची सुविधा, अंगणवाडी, बालवाडीतील सुविधा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची अंमलबजावणी, मामा तलावाची दुरूस्ती, तेंदूपत्त्याच्या दरात तसेच आरोग्य आदी समस्यांबाबत माहिती जाणून घेतली. याशिवाय रस्त्यांची झालेली दुरवस्था, तसेच इतर समस्या जाणून घेतली. कोरची या अतिसंवेदनशील नक्षलप्रभावित तालुक्याच्या गावांमधील समस्या मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन शांतनू गोयल यांनी ग्रामस्थ व पत्रकारांना दिले. याप्रसंगी कोरचीचे संवर्ग विकास अधिकारी वैरागडे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.