-तर चक्काजाम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:12 AM2019-08-30T00:12:31+5:302019-08-30T00:14:22+5:30

एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

chakka jam | -तर चक्काजाम करणार

-तर चक्काजाम करणार

googlenewsNext
ठळक मुद्देभामरागडच्या समस्या सोडवा : एसडीएममार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. शासनस्तरावर अनेकदा मागणी करूनही तालुक्यातील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येत्या ६ सप्टेंबरपर्यंत विविध मागण्या मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील नागरिकांच्या वतीने देण्यात आला.
एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा शासनाविरूद्ध आंदोलन पुकारण्यात येईल, तसेच निषेध म्हणून येथील बाजारपेठ बेमुदत बंद ठेवून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. नायब तहसीलदार निखील सोनवने यांना निवेदन देताना त्रिवेणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष महेश कोंकमुट्टीवार, सचिव राजेंद्र कोठारे उपस्थित होते.
या आहेत प्रमुख मागण्या
अहेरी उपविभागाच्या विकासासाठी अहेरी जिल्ह्याची निर्मिती करणे, पर्लकोटा नदीवरील पुलाचे काम सुरू करणे, भामरागड न.पं.अंतर्गत सर्वांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करणे, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आलापल्लीवरून टॉवर लाईन टाकणे, वीज दर कमी करणे, बीएसएनएलची फोर-जी सेवा सुरू करून फ्रिक्वेंसी वाढविणे, आठवडी बाजारासाठी नवीन जागा देणे. बसस्थानक उभारणे यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.

Web Title: chakka jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.