अन्यायग्रस्त सफाई कामगार कुटुंबासह करणार चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:30+5:302021-06-16T04:48:30+5:30
आरमोरी : नगरपरिषद अंतर्गत कंत्राटदाराने गेल्या दोन महिन्यापासून कामावरून बंद केलेल्या ७० सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे, ...
आरमोरी : नगरपरिषद अंतर्गत कंत्राटदाराने गेल्या दोन महिन्यापासून कामावरून बंद केलेल्या ७० सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे, आरमोरी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना किमान वेतनानुसार बँकेतुन वेतन अदा करण्यात यावे, सफाई कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करून विमा काढण्यात यावा , कामगाराच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याधिकारी व संबंधित अभियंता यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन आरमोरी येथील अन्यायग्रस्त ७० सफाई कामगार आपल्या कुटुंबासाहित १६ जूनला चक्काजाम आंदोलन करणार आहेत, अशी माहिती सफाई कामगार संघटनेचे प्रमुख पुरुषोत्तम बलोदे, अक्षय भोयर, स्वप्नील राऊत, रेखा कांबळे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
पुरुषोत्तम बलोदे व उपस्थित सफाई कामगारांनी सांगितले की, आरमोरी येथील सफाई कामगारांनी आपल्या न्याय मागण्यासाठी ९ एप्रिल पासून कामबंद आंदोलन केले. परंतु नगरपरिषद मुख्याधिकारी, संबंधित अभियंता व कंत्राटदाराने सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मागील दोन महिन्यापासून सफाई कामगारांवर उपासमारीची पाळी आली, संबंधित कंत्राटदाराने सर्व सफाई कर्मचाऱ्यांना वेतन अदा न करता कामावरून काढून टाकल्याचा प्रकार केला आहे. सफाई कामगारांना न्याय न देता नगरपरिषदेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी व संबंधित अभियंता यांनी अन्यायग्रस्त सफाई कामगारांच्या मागण्यांकडे पाठ फिरविली. उलट संबंधित कंत्राटदारावर नगरपरिषद प्रशासनाने कुठलीही कारवाई न करता त्याला पाठबळ देण्याचे काम करीत असल्याचा आरोप सफाई कामगारांनी केला. सफाई कामगारांच्या मागण्या निकाली काढण्याऐवजी त्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने सफाई कामगारांवर मोठा अन्याय झाला असून त्यांचा रोजगार बुडाल्याने त्यांच्या कुटुंबाचे जगणे कठीण झाले आहेत.
आरमोरी नगरपरिषदेची निर्मिती झाल्यापासून गेल्या तीन चार वर्षांपासून आरमोरी येथील ७० सफाई कामगार नियमित काम करीत होते. शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार त्यांना दिवसाकाठी ५०७ रुपये रोजी मिळायला पाहिजे होती. परंतु संबंधित कंत्राटदाराने अल्प मजुरी देऊन सफाई कामगारांचे आर्थिक शोषण केले, असे सफाई कामगारांनी सांगितले
पत्रकार परिषदेला प्रहारचे निखिल धार्मीक ,दिलीप घोडाम तसेच सफाई कामगार संघटनेचे पुरुषोत्तम बलोदे, अक्षय भोयर, स्वप्नील राऊत, रेखा कांबळे, रीना बांबोळे, वर्षा खेडकर ,वर्षा गुरनुले, वनिता बोरकर, अविनाश उके,व इतर कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
140621\img_20210614_131425.jpg
===Caption===
आरमोरी येथील पत्रकार परिषदेत उपस्थित अन्यायग्रस्त सफाई कामगार