झंकारगोंदी फाट्यावर चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:00 AM2020-10-21T05:00:00+5:302020-10-21T05:00:28+5:30
प्राणपुर (रिट) या गावाचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला सामूहिक दावा तात्काळ बोदालदंड ग्रामपंचायतला देण्यात यावा, प्राणपूर (रीट) कक्ष क्रमांक ४७३ ला बांबू तोड व विक्रीकरिता वन विभागाकडून मंजुरी देण्यात यावी व या रिटी गावाचे वनविभागामार्फत एकूण कक्ष क्रमांक ५४६, ५४७, ४७३ असे तीन कक्ष क्रमांक आहेत. या तीनही कक्ष क्रमांकाचे अधिकार बोदालदंड ग्रामपंचायतीला देण्यात यावे, रीठी गावाचे क्षेत्र सातबारानुसार १.१० हेक्टर आर. जमीन ग्रामपंचायतीला देण्यात यावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : अनेकदा शासनाकडे निवेदन देवून सुद्धा समस्या सुटली नाही तसेच वनविभागाच्या निष्क्रीयपणाला कंटाळून ग्रामपंचायत बोदालदंड अंतर्गत येत असलेल्या बोदालदंड, बेलारगोंदी व बिजेपार या तीन गावातील नागरिकांनी सोमवारी झंकारगोंदी फाट्याजवळ विविध मागण्यांना घेऊन चक्काजाम आंदोलन केले. तहसीलदारांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलन सुरू झाल्याच्या काही वेळानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान कोरचीचे तहसीलदार छगनलाल भंडारी आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी आताच मोजमाप सुरू करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
प्राणपुर (रिट) या गावाचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला सामूहिक दावा तात्काळ बोदालदंड ग्रामपंचायतला देण्यात यावा, प्राणपूर (रीट) कक्ष क्रमांक ४७३ ला बांबू तोड व विक्रीकरिता वन विभागाकडून मंजुरी देण्यात यावी व या रिटी गावाचे वनविभागामार्फत एकूण कक्ष क्रमांक ५४६, ५४७, ४७३ असे तीन कक्ष क्रमांक आहेत. या तीनही कक्ष क्रमांकाचे अधिकार बोदालदंड ग्रामपंचायतीला देण्यात यावे, रीठी गावाचे क्षेत्र सातबारानुसार १.१० हेक्टर आर. जमीन ग्रामपंचायतीला देण्यात यावी. वन विभागामार्फत झालेल्या कामाची योग्य चौकशी करून काम करून घेणाऱ्या वनरक्षकाला तत्काळ कारवाई करून निलंबित करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.
उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षक कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी भोसले यांनी आंदोलकांशी चर्चा केली. परंतु फक्त आश्वासनावर आंदोलन मागे घेणार नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले नंतर उपवनसंरक्षक कुमारस्वामी यांच्या आदेशाने बेळगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी भोसले यांनी २० ऑक्टोंबरपासून मोजणीला सुरुवात करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीनही गावातील नागरिकांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात शेकडो आंदोलनकर्ते उपस्थित होते.