कोरोनासोबत आता डेंग्यू रोखण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:38 AM2021-05-18T04:38:15+5:302021-05-18T04:38:15+5:30
१६ मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन पाळण्यात आला. यानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय ...
१६ मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन पाळण्यात आला. यानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना डेंग्यू नियंत्रणाबाबत सूचना दिल्या.
डेंग्यूचा ताप एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साचून राहणाऱ्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये डेंग्यूच्या आजाराचे डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्यांचे रूपांतर डासात होते. एक डास एकावेळी दीडशे ते दोनशे अंडी घालतो व यातून या डासाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होतो. म्हणून कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून, डासांची उत्पत्ती कमी करून नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
डेंग्यूच्या तापाची लक्षणे आढळल्यास सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत, ग्रामीण रुग्णालयांत व जिल्हा रुग्णालयांत तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
(बॉक्स)
ही लक्षणे आढळल्यास त्वरित दखल घ्या
डेंग्यूच्या आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरूपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायूदुखीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात, डोळ्याच्या आतील बाजूने दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक, तोंड यातून रक्तस्राव होतो. अशक्तपणा, भूक मंदावते. तोंडाला कोरड पडते. ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घेणे आवश्यक आहे.
(बॉक्स)
अशी घ्या काळजी
- आपल्या घराभोवती पाण्याचे डबके साचू देऊ नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करावेत.
- अंगणातील व परिसरातील खड्डे बुजवावेत. त्यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.
- ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहे, त्यांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गप्पी मासे आणून ते त्यात सोडावेत.
- झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावेत. पांघरूण घेऊन झोपावे. सायंकाळी ६ ते ८ यावेळेत दारे-खिडक्या बंद कराव्यात.
- खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. मच्छरदाणीचा वापर करावा. कीटकनाशक औषधीची फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारून घ्यावे.
- घराच्या छतावरील फुटके डबे, टाकाऊ टायर्स, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा.
- दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑइल टाकावे. यामुळे डेंग्यूची अंडी जमून राहत नाहीत.
(कोट)
नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासांची उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. कीटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.
डॉ.कुणाल मोडक,
जिल्हा हिवताप अधिकारी.