नक्षल कारवाया रोखण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:38 AM2017-12-02T00:38:34+5:302017-12-02T00:38:53+5:30
नक्षलवाद्यांनी नोव्हेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत अचानक हिंसक कारवाया सुरू केल्याने पोलीस यंत्रणा त्रस्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी नोव्हेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत अचानक हिंसक कारवाया सुरू केल्याने पोलीस यंत्रणा त्रस्त आहे. त्यात आता त्यांना शनिवार दि.२ पासून सुरू होत असलेल्या पीएलजीए सप्ताहाचा सामना करावा लागणार आहे. नक्षल्यांना या सप्ताहात कोणत्याही नक्षल कारवाया घडविण्यात यश येऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशिल आहे. परंतू दहशतीत असलेल्या नागरिकांना दिलासा देऊन नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडण्याचे कठीण आव्हान या सप्ताहात पोलिसांना पेलावे लागणार आहे.
नक्षल चळवळीतील सदस्य केवळ पोलीस यंत्रणेला आपले शत्रू मानत असले तरी पोलिसांना मदत केल्याचा संशय असणारे सामान्य गावकरीही त्यांच्या दृष्टीने शत्रू ठरतात. यातूनच गेल्या १२ दिवसात चार नागरिकांची हत्या करून एकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यातून गावकºयांमध्ये आपली दहशत पसरविण्याचा हेतू नक्षल्यांनी बºयाच प्रमाणात साध्य केल्याचे दिसून येते. गेल्या जुलै-आॅगस्टमधील नक्षल्यांच्या शहीद सप्ताहात ज्या पद्धतीने गावोगावचे नागरिक नक्षल्यांविरूद्ध खुलेआम रस्त्यावर उतरून आवाज उठविताना दिसले. मात्र दहशतीमुळे यावेळी तशी परिस्थिती दिसत नाही. नागरिकांच्या मनात असंतोष असला तरी नक्षली दहशतीमुळे ते पुढे येण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्याचेही आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.
नक्षल्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी सी-६० पथक आणि सीआरपीएफचे जवान डोळ्यात तेल घालून गस्त करीत आहे. याशिवाय बॉम्बशोधक-नाशक पथकाकडून तपासणी सुरू आहे. छत्तीसगड सीमेकडील भागात नक्षल्यांच्या हालचाली जास्त असल्यामुळे त्या भागावर नक्षलविरोधी अभियान अधिक आक्रमकपणे राबविले जाण्याची शक्यता आहे.
अशा झाल्या ११ दिवसातील हिंसक घटना
दि.१९ - भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील परसा कुटुंबियांवर रात्री घरी झोपेत असताना गोळीबार केला. यात जैनी मुरा परसा (३५) ही महिला जखमी झाली.
दि.२१- धानोरा तालुक्यातील झाडापापडा गावाबाहेरच्या कोंबड बाजारात मंगळवारी दुपारी १.३० वाजतादरम्यान सुुनील तिलकबापू पवार (३५) या इसमाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
दि.२१- धानोरा तालुक्यातील चवेला ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया रानवाही येथील जादो पांडू जांगी (५२) या इसमाचे रात्री ११ वाजता नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सीमेत अपहरण करून मारहाण करीत त्यांची हत्या केली.
दि.२२- धानोरा तालुक्यातील तोडे येथील सुरेश चिनू तोफा (२५) या युवकाचे सायंकाळी शेतातून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली.
दि.२४- कोरची तालुक्यातील कोटगूल येथे घडविलेल्या बॉम्बस्फोटात एक पोलीस हवालदार शहीद तर दोन गंभीर जखमी झाले.
दि.२६- कोरची तालुक्यातील पडियलमेट्टा जंगलात रात्री ८.३० च्या सुमारास सीआरपीएफच्या तुकडीवर नक्षल्यांनी हल्ला केला. या चकमकीत एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले.
दि.२९- अहेरी तालुक्यात पेरमिली उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील येरमणार येथे कोतवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.