प्रतीदिन सात लाख करवसुलीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:16 AM2018-03-16T00:16:43+5:302018-03-16T00:16:43+5:30
तब्बल २० वर्षाच्या कालावधीनंतर नगर परिषदेने कर वसुलीची धडक मोहीम सुरू करून थकीत करधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. तरीही १४ मार्चपर्यंत मालमत्ता कराची केवळ १ कोटी ५० लाख ४३ हजार रूपये एवढी वसुली झाली आहे.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : तब्बल २० वर्षाच्या कालावधीनंतर नगर परिषदेने कर वसुलीची धडक मोहीम सुरू करून थकीत करधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. तरीही १४ मार्चपर्यंत मालमत्ता कराची केवळ १ कोटी ५० लाख ४३ हजार रूपये एवढी वसुली झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्याला केवळ १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नगर परिषदेला १ कोटी ३ लाख ६० हजार रूपयांची वसुली करावी लागणार असून त्यासाठी दर दिवशी सात लाख रूपये कर वसुली होणे गरजेचे आहे.
गडचिरोली शहरात एकूण ११ हजार २०० मालमत्ताधारक आहेत. काही मालमत्ताधारक नियमितपणे कराचा भरणा करतात. मात्र काही मालमत्ताधारकांनी मागील सात ते आठ वर्षांपासून मालमत्ता करच भरला नाही. आजपर्यंत नगर परिषद सुध्दा कोणतीही कारवाई करीत नसल्याने मालमत्ता करधारक कराचा भरणा करीत नव्हते. नगर विकास विभागाने कोणत्याही परिस्थितीत ९० टक्केपेक्षा कर वसुली करण्याचे निर्देश नगर परिषदेला दिले आहेत. त्यामुळे नगर परिषदेने मागील एक महिन्यापासून कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. कर वसुलीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मागील दोन दिवसांपासून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. तरीही मालमत्ता कराची वसुली बुधवारपर्यंत केवळ ५९.२१ टक्के एवढीच झाली आहे. मालमत्ता कराची एकूण मागणी सुमारे २ कोटी ५४ लाख ४ हजार ४७२ एवढी आहे. त्यापैकी बुधवारपर्यंत १ कोटी ५० लाख ४३ हजार ७७३ रूपयांची वसुली झाली आहे. केवळ ५९.२० टक्के वसुली झाली असल्याने उर्वरित ४० टक्के वसुली करण्याचे आव्हान नगर परिषदेसमोर आहे. आर्थिक वर्ष संपण्याला केवळ आता १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. या १५ दिवसात अधिकाधिक वसुली होईल. यासाठी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागले असल्याचे दिसून येते.
पाणीपट्टी वसुली समाधानकारक
गडचिरोली शहरात एकूण ७ हजार ६०० नळधारक आहेत. अर्धा इंच नळधारकावर वार्षिक १ हजार ३५० रूपये तर पाऊण इंच नळधारकारवर २ हजार ४०० रूपये कर आकारला जातो. पाणीपट्टीची एकूण मागणी १ कोटी ६७ लाख ५६ हजार ५०५ रूपये आहे. त्यापैकी १४ मार्चपर्यंत सुमारे १ कोटी ५२ लाख ९० हजार ६८४ रूपयांची पाणीपट्टी वसुली झाली आहे. टक्क्यामध्ये हे प्रमाण ९१.२५ टक्के एवढे असून मालमत्ता कराच्या तुलनेत पाणीपट्टीची वसुली समाधानकारक असल्याचे दिसून येते. पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी नगर परिषदेचे कोट्यवधी रूपये खर्च होतात. त्यामुळे पाणीपट्टी थकीत राहणार नाही, याची दक्षता पाणी पुरवठा विभाग वर्षभर घेत असल्याने पाणीपट्टीची वसुली तुलनेने अधिक आहे. एक वर्षापेक्षा अधिक कालावधीत पाणीपट्टी थकल्यास संबंधित नळधारकाचा नळ कनेक्शन कापले जाते.
जप्तीनंतर वसुलीचे प्रमाण वाढले
मागील अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ता करधारकांच्या वस्तू जप्त करण्याची मोहीम नगर परिषदेने दोन दिवसांपासून सुरू केली आहे. याचा धसका घेत अनेक नागरिक नगर परिषदेच्या कार्यालयात स्वत: जाऊन कराचा भरणा करीत आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून कर वसुलीचे प्रमाण वाढले आहे. ३१ मार्चपर्यंत कर वसुली ९० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा न.प. अधिकाऱ्यांना आहे.