चाैकानजीकचा चामाेर्शी मार्ग परिसर झाला माेकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 05:00 AM2021-12-13T05:00:00+5:302021-12-13T05:00:34+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या मार्गालगत कार्यालयाची संरक्षण भिंत नव्याने बांधण्यात येणार आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या दाेन्ही मार्गांलगत नाली बांधून रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने येथील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. सूचना दिल्यानंतर फूटपाथ दुकानदारांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढले. तर प्रशासनाच्या वतीने या मार्गावरील माेठी झाडे ताेडण्यात आली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : चामाेर्शीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गडचिराेली शहरातून सुरू आहे. दरम्यान, शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या बाजूचे काम केमिस्ट भवनाजवळ पाेहाेचले आहे. दाेन्ही बाजूंचे काम नालीसह पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. दरम्यान, इंदिरा गांधी चाैकालगतच्या फूटपाथ दुकानांचे अतिक्रमण काढल्याने हा परिसर माेकळा झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या मार्गालगत कार्यालयाची संरक्षण भिंत नव्याने बांधण्यात येणार आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या दाेन्ही मार्गांलगत नाली बांधून रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने येथील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. सूचना दिल्यानंतर फूटपाथ दुकानदारांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढले. तर प्रशासनाच्या वतीने या मार्गावरील माेठी झाडे ताेडण्यात आली.
गेल्या अनेक महिन्यांपासून चामाेर्शी मार्गाच्या सिमेंट काॅक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार व कंपनीचे ढिसाळ नियाेजन असल्याने या मार्गाच्या कामात प्रचंड लेटलतीफपणा दिसून येत आहे. पावसाळ्यात शहरवासीय व या मार्गाने आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पावसाळ्यात एका बाजूचा रस्ता खाेदून ठेवण्यात आल्याने त्यात पावसाचे पाणी साचले हाेते. दरम्यान, अनेकदा या मार्गावर वाहतूक विस्कळित झाली. या मुद्यावर शहरवासीयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. आता प्रशासनाच्या वतीने राेड व नाली बांधकामाला गतीने सुरुवात करण्यात येणार असल्याने गडचिराेलीकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
दरम्यान, शनिवारी चामाेर्शी मार्गाच्या दाेन्ही बाजूंकडील माेठी झाडे ताेडून परिसर माेकळा करण्यात आला. आता या दाेन्ही मार्गांवरील सर्वच फूटपाथ दुकाने दिसेनासे झाले आहेत.
आमचा राेजगार हिरावू नका
- प्रशासनाने संरक्षण भिंत, राेड व नालीचे बांधकाम जरूर करावे, मात्र आमचा राेजगार हिरावू नये. नालीवर किंवा रस्त्याच्या कडेला थाेड्याशा जागेत आमचे दुकान राहू द्यावे, अशी भावना या दाेन्ही मार्गांवरील फूटपाथ दुकानदारांनी व्यक्त केली आहे. आमच्या राेजगारावर परिणाम हाेत असेल तर शासन व प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
पार्किंग व्यवस्था कुठे?
- गडचिराेली नगरपालिका प्रशासन व रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या प्रशासनाचे याेग्य नियाेजन नसल्याने गडचिराेली शहरातील इंदिरा गांधी चाैक व चारही मुख्य मार्गावर वाहन पार्किंगची व्यवस्था मुळीच नाही. परिणामी, वाहनधारक आपली दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे अपघातास आमंत्रण मिळते. याबाबत प्रशासन कमालीचे उदासीन दिसून येते.