पत्नीला मारहाण करणाऱ्याला सहा महिन्यांचा कारावास चामोर्शी न्यायालयाचा निर्णय
By admin | Published: May 31, 2016 01:20 AM2016-05-31T01:20:18+5:302016-05-31T01:20:18+5:30
पत्नीशी वारंवार भांडण करून तिच्यावर चाकुने वार करून तिला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी पतीस चामोर्शीच्या
चामोर्शी : पत्नीशी वारंवार भांडण करून तिच्यावर चाकुने वार करून तिला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी पतीस चामोर्शीच्या तालुका व सत्र न्यायालयाने सोमवारी सहा महिन्यांचा सश्रम कारावास व आठ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. विलास सीताराम दुर्गे (३९) रा. गुंडापल्ली असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
विलास दुर्गे हा आपल्या पत्नीशी नेहमी वाद घालून तिला त्रास द्यायचा या त्रासामुळे त्याची पत्नी आष्टी येथे माहेरी आपल्या भावाकडे राहत होती. दरम्यान विलास दुर्गे याने आष्टी येथे जाऊन तिच्यावर २६ जुन २०१० रोजी चाकुने वार केला. यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेची तक्रार पत्नीने मुलचेरा पोलीस ठाण्यात दाखल केली. विलास दुर्गे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर प्रकरण चामोर्शीच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले. साक्षीपुरावे तपासून व दोन्ही बाजुच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ध. ज. पाटील यांनी आरोपी विलास दुर्गे याला सहा महिने कारावास व आठ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता डी. व्ही. दोनाडकर यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)