चामोर्शी नगर पंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:39 AM2018-11-07T00:39:34+5:302018-11-07T00:40:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनमानी करीत आहेत. यामुळे चामोर्शी शहराची दुरवस्था झाली आहे, असा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनमानी करीत आहेत. यामुळे चामोर्शी शहराची दुरवस्था झाली आहे, असा आरोप करून महिलांनी मंगळवारी नगर पंचायतीवर घागर मोर्चा काढला. नगर पंचायत कर्मचाऱ्यांनीही मुख्याधिकारी यांची तक्रार केली आहे. तर घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाºया मजुरांनीही संप पुकारला आहे.
चामोर्शी शहरातील पथदिवे मागील सहा दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या कालावधीत शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचºयाची उचल केली जात नसल्याने शहर कचरामय झाले आहे. घंटागाडी दररोज येत नसल्याने कचरा साचला आहे. कचरा कुठे ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असतानाच मागील पाच दिवसांपासून चामोर्शी शहराचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. परिणामी महिलांना ऐन दिवाळीच्या कालावधीत पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी नगर पंचायतीवर मोर्चा काढला. मात्र मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने तहसीलदारांना फोन केला. तहसीलदार एस.के.बावणे यांनी नगर पंचायतीमध्ये येऊन निवेदन स्वीकारले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले. मोर्चाचे नेतृत्व सपना बुरांडे, आशा सोमनकर, गीता सिडाम, मनीषा शेंडे, सुमन सातपुते, शारदा सातपुते, कौशल्या बुरांडे, अल्का सातपुते, सुलभा लटारे, प्रतिभा कोटांगले, उमाबाई गज्जलवार, पार्वता मडावी, पारस परचाके, वंदना उंदीरवाडे, उपासना परचाके, शारदा सातपुते, आशा कुलसंगे, मैनाबाई सातपुते, सुरेखा सातपुते, गीता परचाके, वंदना परचाके, जिजा बन्सोड यांनी केले. मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. चामोर्शी शहरातील सोयीसुविधा न पुरविल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर नगर पंचायतीला कुलूप ठोकण्याचाही इशारा संपातील महिलांनी तहसीलदारांना दिला आहे.
घनकचरा कर्मचारी संपावर
घनकचरा मजुरांना साप्ताहित सुटी मंजूर करावी, मजुरांच्या संख्येत वाढ करावी, मजुरी स्वत: ठेकेदाराने द्यावी, ईपीएफ बद्दलची माहिती मजुरांना उपलब्ध करून द्यावी, सणांच्या दिवशी सुटी द्यावी, त्या दिवशीची मजुरी कपात करू नये, प्रतिदिवस ३०० रूपये मजुरी द्यावी, साप्ताहिक सुटी मंजूर करून त्या दिवसाची मजुरी द्यावी, काही समस्या उद्भवल्यास ठेकेदाराशी संपर्क साधता यावा, म्हणून त्याचा मोबाईल क्रमांक द्यावा आदी मागण्यांसाठी घनकचरा व्यवस्थापनावरील कर्मचाºयांनी सामूहिक संप पुकारला आहे.