ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बदलला दुकानांचा लूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:00 AM2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:45+5:30
गडचिरोली शहरात त्रिमूर्ती चौकालगत व या परिसरातील रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. याशिवाय चंद्रपूर मार्गावर कारगिल चौकापर्यंत व त्यापुढे सुद्धा बाजारपेठ आहे. चामोर्शी, धानोरा व आरमोरी मार्गावर विविध वस्तूंची दुकाने आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही दुकानदारांनी दुकानाचे प्रवेशद्वार सुशोभित केले आहे. मंडप तयार करून विद्युत रोषणाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिवाळी सणानिमित्त बहुतांश नागरिकांकडून विविध वस्तूंची खरेदी आवर्जुन होत असल्याने दिवाळी सणादरम्यान बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. ग्राहकांनी खरेदीसाठी आपल्याच दुकानाला प्राधान्य द्यावे यासाठी यावेळी अनेक दुकानदार विशेष काळजी घेत आहेत. दुकानाचा लूक बदलून आकर्षकपणा वाढविण्याकडे दुकानदारांचा कल वाढला आहे. गडचिरोली शहरात हे ट्रेंड वाढत आहे.
गडचिरोली शहरात त्रिमूर्ती चौकालगत व या परिसरातील रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. याशिवाय चंद्रपूर मार्गावर कारगिल चौकापर्यंत व त्यापुढे सुद्धा बाजारपेठ आहे. चामोर्शी, धानोरा व आरमोरी मार्गावर विविध वस्तूंची दुकाने आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही दुकानदारांनी दुकानाचे प्रवेशद्वार सुशोभित केले आहे. मंडप तयार करून विद्युत रोषणाई केली आहे. ही रोषणाई व झगमगाट पाहून सर्वसामान्य नागरिकांच्या घरी दिवाळी आली नसली तरी शहरी भागात दिवाळीच्या उत्सवाला प्रारंभ झाल्याचे जाणवत आहे. विविध प्रकारचे विद्युत दिवे सायंकाळच्या सुमारास सुरू केले जात आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात रंगीबिरंगी व चकाकणारी तोरणं लावण्यात आली आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे सजावट झालेले दुकान मार्गाने जात असलेल्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दीपावली सणादरम्यान गडचिरोलीची बाजारपेठ रात्री १० वाजतानंतरही सुरू राहत असल्याचे दिसून येत आहे.
खास दिवाळी ऑफर
आपल्या दुकानातील वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी व्हावी, ग्राहकांचा लोंढा आपल्याच दुकानाकडे वळावा, या हेतूने शहरातील काही दुकानदारांनी खास दिवाळी आॅफर सुरू केली आहे. अशा प्रकारची ऑफर कापड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांमध्ये आहे. काही किराणा दुकानदारांनीही विशिष्ट रकमेच्या खरेदीवर सवलत घोषित केली आहे. प्रवेशद्वारातच दिवाळी ऑफरचे फलक झळकत आहेत.
सुवर्णालंकार, इलेक्ट्रिक वस्तू व कपड्यांना प्राधान्य
दिवाळी सणानिमित्त गडचिरोली शहरातील बाजारपेठ सजली असून ग्राहक सोन्याचे दागिने व इलेक्ट्रिक वस्तूच्या खरेदीवर भर देत आहेत. विविध प्रकारच्या पणत्या व आकाश कंदिल विक्रीसाठी आले आहे. रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर रांगोळी व पूजेच्या साहित्याची दुकाने लागली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाजारपेठेत नागरिकांची वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. विशेष करून महिला व युवती सोन्याचे दागिने व कापड खरेदी करताना दिसून येत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांसह विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना दिवाळीनिमित्त बोनस मिळाला आहे. त्यामुळे हे सर्व कर्मचारी व कामगार दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील बरेच नागरिक गडचिरोली शहरात येऊन वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत. एकूणच शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची दिवसभर गर्दी राहात असून आर्थिक उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे.