सौरऊर्जेच्या माध्यमातून चपराळा अभयारण्य टँकरमुक्त
By admin | Published: March 30, 2017 01:58 AM2017-03-30T01:58:44+5:302017-03-30T01:58:44+5:30
उन्हाळ्यात उष्णतामान वाढत असल्याने माणसांप्रमाणेच वन्य प्राण्यांनाही पाण्याची गरज अधिक भासत असते.
पंपाद्वारे पाणवठ्यात होत आहे पाणीपुरवठा : मुबलक प्रमाणात पाण्याची सोय झाल्याने प्राण्यांची संख्या वाढली
सुधीर फरकाडे आष्टी
उन्हाळ्यात उष्णतामान वाढत असल्याने माणसांप्रमाणेच वन्य प्राण्यांनाही पाण्याची गरज अधिक भासत असते. वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, या उद्देशाने वन विभागातर्फे यंदा येथील चपराळा अभयारण्यात पाणवठ्याजवळ बोरवेल खोदून त्यावर सौरप्लेट लावून पंपाद्वारे पाणवठ्यात पाणीपुरवठा केला जात आहे. चपराळा अभयारण्य टँकरमुक्त झाले आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने या अभयारण्यात प्राण्यांची संख्याही वाढत आहे.
सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे उन्हामुळे अभयारण्यातील वीज पंप आपोओप सुरू होतो व सायंकाळ झाल्यावर सदर पंप बंद होतो. पाणीपुरवठा झाल्यावर पाणवठा ओव्हरफ्लो झाल्यानंतर येथील पाणी उतारावरून पडते. पाणवठ्यातील शुद्ध पाणी जनावरांसाठी उपलब्ध झाले आहे. खाली पडलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील प्राणी या चिखलात लोळत असतात. प्राण्याला जखम झाल्यास इतर प्राणी त्याचे चाखण व लोळवण करतात. येथील पाणवठ्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या अलिकडे वाढलेली आहे. चपराळा अभयारण्यात एक वाघ सोडल्यामुळे त्याचेही लोकेशन महिनाभरापूर्वी या ठिकाणी होते, अशी माहिती वन परिक्षेत्राधिकारी कैलुके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.
जवळपास १६ पाणवठ्यांवर अशा प्रकारची व्यवस्था केल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना थंड ठिकाणी राहण्यासाठी बांबुंच्या सहाय्याने नैसर्गिक व्यवस्था करण्याची संकल्पना साकारण्यात येणार आहे, असेही कैलुके यांनी सांगितले.
१६ पंपातून भागते प्राण्यांची तहान
वन विभागाच्या चौकीपासून लगाम व नागुलवाही गावाच्या सीमेपासून रेंगेवाहीपर्यंत एकूण १३४.७८ चौकिमी जागेत चपराळा अभयारण्य व्यापलेला आहे. या अभयारण्यात चितळ, हरिण, नीलगाय आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. या अभयारण्यामध्ये असलेल्या अन्य प्राण्यांना यापूर्वी टँकरद्वारे उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जात होता. मात्र गतवर्षीपासून १६ पंप बसवून सौरऊर्जेच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे येथील प्राणी पाण्यासाठी आता रस्त्यावर अथवा गावाकडे येण्याची शक्यता दिसून येत नाही.