स्वच्छतेचा मंत्र देण्यासाठी रथ दाखल
By admin | Published: November 9, 2016 02:33 AM2016-11-09T02:33:12+5:302016-11-09T02:33:12+5:30
वैैराग्यमूर्ती गाडगेबाबांनी संपूर्ण जीवनभर स्वच्छतेच्या कामासाठी आपले आयुष्य झोकून दिले.
दहा गावांना दिल्या भेटी : गाडगेबाबांचा संदेश गावागावांत पोहोचविणार
देसाईगंज : वैैराग्यमूर्ती गाडगेबाबांनी संपूर्ण जीवनभर स्वच्छतेच्या कामासाठी आपले आयुष्य झोकून दिले. या महापुरूषाचा स्वच्छतेचा संदेश घेऊन सध्या स्वच्छता चित्ररथ गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून सोमवारी हा चित्ररथ मुरखळा येथे पोहोचला. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी या रथाचे पूजन केले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत माळी, सरपंच संदीप बोरकुटे, संवर्ग विकास अधिकारी पचारे आदी उपस्थित होते.
कला पथकाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश परिसरातील नागरिकांना देण्याचे काम करण्यात येत आहे. त्यानंतर सायंकाळी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात स्वच्छतेचा जागर केल्यानंतर हा चित्ररथ मंगळवारी आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव, देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे दाखल झाला. बीएमझेड ५३४१ क्रमांकाचे वाहन तत्कालीन महाराष्ट्र शासनाने गाडगेबाबांना दिले होते. या वाहनातच गाडगेबाबांचे निधन झाले. तो दिवस २० डिसेंबर १९५६ होता. याच वाहनावर हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. गाडगेबाबांच्या स्मृती जपण्यासाठी महाराष्ट्र ग्राम व जलसंधारण विभागातर्फे या रथाच्या माध्यमातून गावागावांत स्वच्छता व लोकांच्या मनाचेही परिवर्तन करण्याचे काम केले जात आहे. स्वच्छताविषयावर नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे काम या चित्ररथाच्या माध्यमातून शासनाचे अधिकारी करीत आहेत. देसाईगंज मार्ग हा चित्ररथ मंगळवारी गोंदिया जिल्ह्यात रवाना झाला. (प्रतिनिधी)