रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र चामोर्शीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:01 AM2017-10-14T00:01:48+5:302017-10-14T00:02:00+5:30
यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात ३४ हजार ४१२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे चामोर्शी तालुक्यात सिंचनाच्या सोयीसुविधा बºयापैकी असल्याने या तालुक्यात रब्बीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १० हजार ५८० हेक्टर क्षेत्रावर यंदा रब्बी पिकांची लागवड करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रब्बी पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार हेक्टर आहे. यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गहू ७५५ हेक्टर, सूर्यफूल २५ हेक्टर, तीळ २ हजार ८५८ हेक्टर, ऊस १६० हेक्टर, हरभरा ३ हजार ८३० हेक्टर तसेच सर्वाधिक ६ हजार ६५० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले. विशेष म्हणजे गतवर्षी २०१६-१७ च्या हंगामात १०० टक्के क्षेत्रात रब्बी पिके गडचिरोली जिल्ह्यात घेण्यात आली होती.
आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरात जमिनीची सुपिकता चांगली असल्याने या भागातील बहुतांश शेतकरी आता धानपिकासोबतच रब्बी हंगामातील हरभरा व सूर्यफुलाच्या शेतीकडे वळले आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात गहू पिकाची पेरणीही बºयापैकी होत असते. एकूणच जिल्ह्यातील शेतकरी आता खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात विविध पिके घेत आहेत.
परतीच्या पावसाने हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामातील धान व इतर पिके अंतिम टप्प्यात असून ते निघण्याच्या स्थितीत आहेत. हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू असून काही ठिकाणी मळणीही केली जात आहे. खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात परतीच्या जोरदार पावसाने पिकांना तडाखा दिला.या पावसामुळे शेतजमिनीमध्ये प्रचंड ओलावा निर्माण झाला आहे. परिणामी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी नांगरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा रब्बी पिकांचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता अनेक शेतकºयांनी व्यक्त केली आहे. धान कापणीनंतर रब्बी पिकाच्या पेरणीस दरवर्षी वेग येत असतो.