चामोर्शी डांबरी राज्य महामार्गाला मुरमाचा थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:09 AM2018-08-23T01:09:51+5:302018-08-23T01:11:04+5:30
गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गाची आधीच दुरवस्था झाली होती. त्यात पुन्हा रविवारपासून मंगळवारपर्यंत गडचिरोली शहरासह जिल्हाभरात संततधार पाऊस झाल्याने चामोर्शी मार्गावरील डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे निर्माण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गाची आधीच दुरवस्था झाली होती. त्यात पुन्हा रविवारपासून मंगळवारपर्यंत गडचिरोली शहरासह जिल्हाभरात संततधार पाऊस झाल्याने चामोर्शी मार्गावरील डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे निर्माण झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आता तात्पुरती सुविधा म्हणून डाक कार्यालयापासून शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत या मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात गिट्टी व छुरीचा वापर करूनही ते टिकत नसल्याच्या कारणावरून मुरूमाचा थर या मार्गाला दिला जात आहे.
चामोर्शी मार्गावरील डाक कार्यालयापासून शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले. या मार्गावरील बऱ्याच खड्ड्यांची खोली दीड ते दोन फूट आहे. आता पावसाचे पाणी खड्ड्यात साचले असल्याने वाहनधारकांना सायंकाळी व रात्रीच्या सुमारास या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे खड्ड्यातून वाहन गेल्यावर यातील घाणपाणी अंगावर उडत होते.
चामोर्शी मार्ग खड्डेमय बनल्यामुळे शाळकरी मुले, मुली व महिलांना दुचाकी नेण्यासाठी अडचणीचे ठरत होते. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकीस्वाराला अपघात होऊन किरकोळ दुखापतीही झाल्या होत्या. सदर मार्गाच्या दुरवस्थेबाबत लोकमतने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या वृत्ताची दखल घेऊन व नागरिकांची मागणी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने मंगळवारपासून या मार्गावरील मोठमोठे खड्डे मुरूमाच्या सहाय्याने बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र खड्ड्यात टाकलेला मुरूम पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास किती दिवस टिकणार, असा प्रश्न गडचिरोलीकरांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यात पक्के काम होत नसल्याने प्रशासनाकडून ही तात्पुरती सुविधा केली जात आहे.