स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेते आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:45 AM2018-02-22T00:45:05+5:302018-02-22T00:45:30+5:30
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गडचिरोली जिल्हा केरोसीन व स्वस्त धान्य विक्रेता वेल्फेअर असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गडचिरोली जिल्हा केरोसीन व स्वस्त धान्य विक्रेता वेल्फेअर असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान जिल्हाभरातून आलेले केरोसीन व स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.
स्थानिक इंदिरा गांधी चौकातून दुपारी १ वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या दुकानदारांचा मोर्चा निघाला. या मोर्चात संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलाश शर्मा, उपाध्यक्ष अरूण कुंभलवार, सचिव अनिल भांडेकर, आरमोरीचे तालुकाध्यक्ष दादाजी माकडे, अनिल किरमे, रवींद्र निंबेकार, मुलचेराचे अशोक करमरकर, सचिव मनिंद्र हलदार, चामोर्शीचे वाघाडे, देसाईगंजचे दादाजी भर्रे, नाजमी शेख, कुरखेडाचे वाय. जी. मांडवे, गडचिरोलीचे रामदास पिपरे, सिरोंचाचे शबीर अली, धानोराचे जाकीर कुरेशी, अहेरीचे तालुकाध्यक्ष एम. बी. बेझलवार, मुलचेराचे अशोक करमकर, एटापल्लीचे बाबुराव गंपावार आदीसह जिल्हाभरातील हजारो दुकानदार सहभागी झाले होते. मोर्चापूर्वी गांधी चौकात सभा घेण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर तिथेही सभा घेण्यात आली. या सभेदरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यमान सरकारच्या धान्य वितरण प्रणालीच्या धोरणावर जोरदार टीका केली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. मोर्चादरम्यान दुकानदारांनी घोषणाबाजी केली.
निवेदनातील मागण्या
वाढत्या महागाईनुसार स्वस्त धान्य दुकानदारांचा खर्च देण्यात यावा, बंद केलेल्या केरोसीन दुकानातून सरकारने गॅस वितरण सुरू करावे, २००९ ते २०११ दरम्यानचे वाहतुकीचे बिल, पोत्यानिहाय कमिशन व हमालीभाडे देण्यात यावे, वाहतुकीचे बिल व्याजासह देण्यात यावे, दुकानदारास किमान २४ हजार रूपये वेतन देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.