स्वस्त धान्य दुकानातील साखर महागली
By admin | Published: April 14, 2017 01:15 AM2017-04-14T01:15:56+5:302017-04-14T01:15:56+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गरीब नागरिकांना शासनाकडून धान्य व साखर पुरवठा केली जाते.
गरिबांना फटका : १३.५० रूपयांवरून १५ रूपये किलोवर पोहोचली साखर
गडचिरोली : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गरीब नागरिकांना शासनाकडून धान्य व साखर पुरवठा केली जाते. मात्र राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून दिल्या जाणाऱ्या साखरेच्या किमतीत प्रती किलो मागे १ रूपया ५० पैशाने वाढ केली आहे. त्यामुळे गरीब माणसाच्या खिश्याला साखर खरेदी करताना फटका बसणार आहे.
राज्य सरकारने अन्न, धान्य वाहतुकीचे दर सुधारीत केले आहेत. साखर वाहतुकदारांकडून वाहतूक दरवाढीची मागणी केली जात होती. साखरेचे वाढलेले बाजारभाव विचारात घेऊन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने १३ रूपये ५० पैसे प्रती किलो साखरेचा भाव आता १५ रूपये केला आहे, असा दावा शासनाच्या वतीने करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांकडून कमिशन वाढीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ही भाव वाढ अपरिहार्य असल्याचे सरकारच्या वतीने या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कळविण्यात आले आहे.
स्वस्त धान्य दुकानातून ठराविक शिधापत्रिकाधारकांनाच साखरेचा पुरवठा केला जातो. या नव्या दरवाढीमुळे ग्रामीण व शहरी भागातील स्वस्त धान्य दुकानातून साखर घेणाऱ्या ग्राहकांना फटका बसणार आहे. एप्रिल २०१७ पासून स्वस्त धान्य दुकानातून ही वाढीव दरवाढ लागू केली जाणार आहे, अशी माहितीही अन्न व नागरी व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे. वाढत्या महागाईमध्ये आता रेशनच्या साखरेसाठीही अधिकची किमत गरीब नागरिकांना मोजावी लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ
स्वस्त धान्य दुकानदारांना यापूर्वी प्रति क्विंटल साखरेमागे केवळ ६ रूपये ३६ पैसे एवढेच कमिशन दिले जात होते. सदर कमिशन अत्यंत कमी असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनांनी शासनावर दबाव टाकून कमिशन वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता प्रती क्विंटल ७० रूपये कमिशन दिले जाणार आहे.