पोलिसांची रेकी करायला आला अन् स्वत:चा जाळ्यात अडकला; दोन लाखांचे बक्षीस असलेला छत्तीसगडचा नक्षलवादी गजाआड
By संजय तिपाले | Published: December 6, 2023 07:15 PM2023-12-06T19:15:22+5:302023-12-06T19:16:34+5:30
भामरागड तालुक्यात कारवाई
संजय तिपाले, गडचिरोली: खून, जाळपोळीच्या गंभीर गुन्ह्यांसह पोलिसांची शस्त्रे लुटून नेणाऱ्या, सरकारी मालमत्तेचे नुकसान करत धुडगूस घालणाऱ्या छत्तीसगडच्या नक्षलवाद्याला जेरबंद करण्यात पोलिसांना ६ डिसेंबर रोजी यश आले. सध्या नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु आहे. पोलिसांची रेकी करण्यासाठी तो भामरागड तालुक्यात आला होता. मात्र, स्वत:च पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने दोन लाखांचे बक्षीस ठेवलेले होते.
महेंंद्र किष्टय्या वेलादी (वय ३२ , रा. चेरपल्ली, ता. भोपालपट्टनम, जि. बिजापूर ,छत्तीसगड) असे त्या नक्षल्याचे नाव आहे. २ ते ८ डिसेंबरदरम्यान नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु आहे. या सप्ताहात सार्वजनिक मालमत्ता तसेच पोलिसांना नुकसान पोहोचविण्याचा नक्षल्यांचा डाव असतो.१८ दिवसांत नक्षल्यांनी चार निष्पाप नागरिकांची हत्या करुन पोलसांना खुले आव्हान दिले होते. दरम्यान, भामरागड तालुक्यातील दामरंचा उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रावती नदीजवळ महेंद्र वेलादी हा पोलिसांच्या हालचाली टिपण्यासाठी आला होता. गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, सीआरपीएफ ९ बटालियन जी कंपनीचे जवान व उपपोस्टे दामरंचा येथील पोलिसांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्याच्या मुसक्या आवळल्या. तो दामरंचा व मन्नेराजाराम या दोन्ही पोस्ट पार्टीच्या जवानांच्या नियमित कामकाजाच्या हालचालींवर पाळत ठेवून अहेरी दलमच्या माओवाद्यांना माहिती पुरवीत होता. पोलिस अधीक्षक नीलोत्पल अपर अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जानेवारी २०२२ ते आतापर्यंत पोलिसांनी ७२ नक्षल्यांना गजाआड केले आहे.
अशी आहे गुन्हे कारकीर्द
मे २०२३ मध्ये सँड्रा गावातील निष्पाप नागरिकाची हत्या, सँड्रा जंगलात डिसेंबर २०१७ मध्ये व टेकामेट्टा जंग परिसरात डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग होता. २०२३ मध्ये कापेवंचा ते नैनेर मार्गावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण तसेस त्यांचे वाहन पेटवून दिल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.