छत्तीसगडची महिला माओवादी लक्ष्मी मज्जीचे आत्मसमर्पण
By संजय तिपाले | Updated: November 9, 2024 19:38 IST2024-11-09T19:37:39+5:302024-11-09T19:38:11+5:30
दोन लाखांचे होते बक्षीस: सीमावर्ती भागातील हिंसक कारवायात सहभाग

छत्तीसगडची महिला माओवादी लक्ष्मी मज्जीचे आत्मसमर्पण
गडचिरोली : सीमावर्ती भागातील अनेक हिंसक कारवायात सहभाग असलेली छत्तीसगडची महिला माओवादी लक्ष्मी बंडे मज्जी (४२,रा. कुगलेर ता. बेद्रे भैरमगड जि. बजापूर, छत्तीसगड) हिने ९ नोव्हेंबरला गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिच्या अटकेसाठी दोन लाखांचे बक्षीस होते.
लक्ष्मी बंडे मज्जी ही २०१७ मध्ये नक्षल चळवळीत सामील झाली. भामरागड व दंद्रावती एरिया कमिटीतील चेतना नाट मंचमध्ये ती सदस्यपदावर भरती झाली होती.
दलममध्ये असताना माओवाद्यांना जेवण पुरवणे तसेच इतर आवश्यक साहित्य पुरविणे इत्यादी कामे ती करायची. माओवादी चळवळीत वैवाहिक आयुष्य जगता येत नाही, शिवाय जीवन अंध:कारमय होण्याचा धोका आहे. ही बाब ओळखून अखेर तिने शस्त्र खाली ठेवण्याचे ठरवले. तिने महाराष्ट्र पोलिसांची आत्मसमर्पण योजना चांगली असल्याने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिला आत्मसमर्पणाबद्दल आता केंद्र व राज्य सरकारकडून मिळून साडेचार लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
आतापर्यंत ३० जणांचे आत्मसमर्पण
दरम्यान, २०२२ पासून आतापर्यंत ३० माओवाद्यांनी पोलिसांना शरण येणे पसंत केले. यामुळे नक्षल्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. आत्मसमर्पण योजनेतून त्यांना बक्षीस स्वरुपात रक्कम, राहायला घर, रोजगार अशा सोयीसुविधा पुरविण्यात येतात,
यासाठी नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, अजय कुमार शर्मा , पोलिस अधीक्षक नीलोत्पल , कमांडंट दाओ इंजिरकान कींडो हे परिश्रम घेत आहेत.