मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना भेटणार
By admin | Published: March 11, 2016 02:05 AM2016-03-11T02:05:56+5:302016-03-11T02:05:56+5:30
गोदावरी नदीवर तेलंगणा राज्यात मेडिगट्टा-कालेश्वर हा सिंचन प्रकल्प होऊ घातला आहे.
मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पासंदर्भात
दीपक आत्राम यांचे नेतृत्व : २२ गावातील शेतकरी व्यथा सांगणार
गडचिरोली : गोदावरी नदीवर तेलंगणा राज्यात मेडिगट्टा-कालेश्वर हा सिंचन प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील २२ गाव बुडीत क्षेत्रात जाणार असून या भागात निर्माण होणाऱ्या पाच प्रकल्पांमुळे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावेही पाण्याखाली बुडणार आहे. या सर्व गावातील नागरिकांची व्यथा सांगण्यासाठी शेतकरी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा सांगणार आहे, अशी माहिती माजी आमदार दीपक आत्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मेडिगट्टा-कालेश्वर बॅरेज बांधकामासंदर्भात दोन ते तीन वेळा हवाई सर्वेक्षण तेलंगणा सरकारकडून करण्यात आले. या भागात बॅरेज होऊ नये, अशी भूमिका आदिवासी विद्यार्थी संघटनेने घेतली आहे. ५ फेब्रुवारी रोजी आठ हजार नागरिकांच्या उपस्थितीत सिरोंचा तहसील कार्यालयावर माजी आमदार दीपक आत्राम व जि.प. सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी या बारमाही वाहणाऱ्या नद्यावर तेलंगणाकडून प्रकल्प उभे केले जात आहे. प्राणहिता नदीच्या उगमस्थानीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सृजला-श्रवंती बॅरेज (चव्हेला धरण) ८० हजार कोटी रूपये खर्चून तेलंगणा सरकार उभारत आहे. या धरणामुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील १६ गावे प्रभावित होणार आहे. अहेरी, मुलचेरा, सिरोंचा हे तालुके पूर्णत: कोरडे होतील. पिण्याला व शेतीला पाणी उरणार नाही, अशी अवस्था निर्माण होणार आहे. प्राणहिता गोदावरीच्या संगमावर मेडिगट्टा बॅरेजचे काम ७१६३४ कोटी रूपये खर्चून तेलंगणा सरकार करीत आहे. या कामासाठी १०३०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. यामुळे तेलंगणा राज्याला फायदा होणार असला तरी सिरोंचा तालुक्याचे प्रचंड नुकसान होणार आहे. या भागातील लोकांवर स्थानांतरीत होण्याची पाळी येणार असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कसा सोडविला जाणार, याबाबत महाराष्ट्र सरकारचा कोणताही आराखडा तयार नाही. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी या भागात जाऊन हा प्रकल्पच मंजूर नसल्याचे म्हटले आहे. असेल तर पुरावे द्या, असे त्यांनी जनतेला सांगितले. तर खासदार अशोक नेते यांनी पुढील निवडणुका लक्षात घेऊन बॅरेजचे वातावरण काही लोक वातावरण तापवित असल्याची टीका केली. एकूणच लोकप्रतिनिधींचा हा सारा प्रकार संतापजनक असल्याचे दिसून येत आहे. दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे करार केला. परंतु जो भाग या धरणामुळे बाधीत होणार आहे. त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा सुध्दा जाणल्या नाही, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व जनतेच्या प्रतिनिधींना घेऊन आपण स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची मुंबई येथे लवकरच भेट घेणार आहो, असे माजी आमदार दीपक आत्राम यांनी म्हटले आहे. या संदर्भात आदिवासी विद्यार्थी संघाने दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात एक बैठक घेतली. या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनिती ठरविण्यात आली. या बैठकीला कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, मंदाशंकर, सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, पेंटिपाकाचे उपसरपंच कुमरी सडवली, व्यंकटी करसपल्ली, रवी सल्लम, रवी बोनगोनी, श्याम बेजन्नी, मारोती गागारपू, नागराज इगली, श्रीनिवास जानकी, लागा सत्यम, रवी सुलता, लक्ष्मण बुल्ले, नागेश दुग्गल, गणेश दासरवार जुलेद शेख, आरीफ पठाण, डॉ. शंकर दुर्गे उपस्थित होते.