मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तपास अधिकाऱ्यांचा सत्कार
By admin | Published: March 12, 2017 02:04 AM2017-03-12T02:04:05+5:302017-03-12T02:04:05+5:30
गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचे दिल्ली कनेक्शन हुडकून काढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात गौरव करण्यात आला.
सुहास बावचेंचा गौरव : साईबाबासह सहा जणांना शिक्षा
गडचिरोली : गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचे दिल्ली कनेक्शन हुडकून काढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात गौरव करण्यात आला. सुहास बावचे असे या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव असून ते नागपुरात सध्या पोलीस उपायुक्त म्हणून पोलीस दलात सेवा देत आहेत. यापूर्वी ते गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते.
नक्षलग्रस्त अहेरी भागात कार्यरत असताना २२ आॅगस्ट २०१३ रोजी एसडीपीओ सुहास बावचे यांनी हेम मिश्रा, महेश तिरकी व पांडू नरोटे या तिघांना अहेरीच्या बसस्थानक परिसरातून अटक केली होती. हे तिघे नक्षलवाद्यांना भेटण्याकरीता जात होते. याची भणक लागताच एसडीपीओ बावचे यांनी आपल्या पथकासह मोठ्या शिताफीने ही कामगिरी पार पाडली होती. त्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी करून त्यांनी विजय तिरकी, प्रशांत राही या दोघांना अटक केली.
एवढेच नव्हे तर गडचिरोलीच्या नक्षलवाद्यांना बौध्दिक खाद्य पुरविणारा खरा सूत्रधार दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक असल्याचे तपासात दिसून आल्यानंतर बावचे यांनी याप्रकरणी प्रा. जे. एन. साईबाबा यांनादेखील अटक केली होती. संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करून आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करून बावचे यांनी मोठी कामगिरी केली होती. त्याआधारे प्रकरण न्यायप्रविष्ठ होऊन गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात नुकताच या प्रकरणाचा निकाल लागला.