मुख्यमंत्री आज गडचिरोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:45 AM2018-04-15T00:45:09+5:302018-04-15T00:45:09+5:30
शहरातील बहुप्रतीक्षित जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे रविवार दि.१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत प्रमुख अतिथी असतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील बहुप्रतीक्षित जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे रविवार दि.१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत प्रमुख अतिथी असतील. यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारलेल्या नियोजन सभागृहाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
गेल्यावर्षी मे महिन्यात कोनसरी येथील लॉयड्स मेटल अॅन्ड एनर्जी लि.च्या लोहप्रकल्पाच्या कोनशिला समारंभासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीत आले होते. त्या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला वेग येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरणासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. आता मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते संबंधित सर्व शेतकºयांना रविवारी धनादेशांचे वाटप होणार आहे. सोबतच कोनसरीतील जमिनीचे लॉयड्स मेटल कंपनीकडे हस्तांतरण केले जाणार आहे.
रुग्णालयाला आबांचे नाव द्या
महिला व बाल रुग्णालयाला तत्कालीन पालकमंत्री आबा उर्फ आर.आर.पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजुरी मिळाली होती. त्यांच्याच हस्ते भूमिपूजनही झाले. राजकारणापलिकडे जाऊन त्यांनी जिल्ह्यात अनेक विकास कामांना गती दिली होती. त्यामुळे या रुग्णालयाला आर.आर.पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश भोगे यांनी केली आहे.