आदिवासी व जवानांसाेबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी; भाऊबीजेला महिला पाेलिसांनी केले औक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 08:25 AM2023-11-16T08:25:17+5:302023-11-16T08:25:53+5:30
मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यामुळे पोलिस जवानांचा आनंद द्विगुणित हाेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढला.
गडचिराेली : नक्षलग्रस्त व अतिशय दुर्गम भागात माेडत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी पाेलिस स्टेशनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन आदिवासी व पोलिस जवान यांच्यासाेबत दिवाळी साजरी केली. यावेळी महिला पाेलिसांनी मुख्यमंत्र्यांना भाऊबीजेनिमित्त औक्षण केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्थानिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यामुळे पोलिस जवानांचा आनंद द्विगुणित हाेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढला.
पिपली बुर्गी पाेलिस स्टेशनच्या आवारात नवीन प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. याचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच नवीन विश्रामगृहाचे लाेकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जनजागरण मेळावा झाला. मेळाव्याला उपस्थित नागरिकांना धाेतर, साड्या, मच्छरदाणी, ब्लँकेट, स्प्रेपंप व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना सायकल, नाेटबुक, कंपास बाॅक्स, बिस्कीट, व्हाॅलिबाॅल नेट, क्रिकेटचे साहित्य देण्यात आले.
सलग दाेन वर्षे जवानांसाेबत दिवाळी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी भामरागड तालुक्यातील धाेडराज येथील पोलिस स्टेशनला भेट देऊन तेथील जवानांसाेबत दिवाळी साजरी केली हाेती. यावर्षी एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी पोलिस स्टेशनला भेट दिली.
पाेलिसांच्या कामगिरीचे काैतुक
मुख्यमंत्र्यांनी गडचिराेली पोलिस दलाच्या कामगिरीचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरीबाबत काैतुक केले. पोलिस जवान आपल्या घरापासून दूर राहून देश व राज्याचे संरक्षण करतात. येथील पोलिस अधीक्षक नीलाेत्पल यांच्या नेतृत्वात पोलिस दल शक्तिशाली व स्मार्ट बनले आहे. केंद्रीय मंत्रीसुद्धा गडचिराेली पोलिस दलाच्या कामगिरीचा उल्लेख करतात, असे गाैरवाेद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.