चिखली व कोरेगावातील धानाच्या पुंजण्यांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:15 AM2017-12-20T01:15:53+5:302017-12-20T01:19:39+5:30
कुरखेडा तालुक्यातील चिखली व देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील धानाच्या पुंजण्याला अज्ञात इसमांनी सोमवारच्या रात्री आग लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा/कोरेगाव/चोप : कुरखेडा तालुक्यातील चिखली व देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील धानाच्या पुंजण्याला अज्ञात इसमांनी सोमवारच्या रात्री आग लावली. यामध्ये लाखो रूपयांचे धान जळून खाक झाले आहे.
चिखली येथील शेतकरी इसरू केजू मडावी यांनी धानाचा पुंजना रचून ठेवला होता. या पुंजण्यामध्ये ३५० भारे होते. आगीमुळे जवळपास २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची तक्रार मडावी यांनी कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
कोरेगाव येथील गाव तलावाच्या बाजुला असलेल्या प्रभू निमकर, हरिदास निमकर व मदन लाडे यांच्या मालकीच्या पुंजण्याला आग लागली. यामध्ये प्रभू निमकर यांचे ५५० भाऱ्यांचे पुंजणे, हरिदास निमकर यांचे ४०० भाऱ्यांचे पुंजणे व मदन लाडे यांचे ४०० भाऱ्यांचे पुंजणे जळून खाक झाले. आग लागल्याचे माहिती होताच अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत तिन्ही पुजण्यांना आगीने व्यापले होते. तणसाचे ढिग जवळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेचा पंचनामा तलाठी शितल शिंपी यांनी केला. आग लागल्याचे नेमके कारण कळू शकले नाही.