बाल रूग्णालयाला अधीक्षक मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:53 PM2017-08-06T23:53:17+5:302017-08-06T23:53:38+5:30
येथील महिला व बाल रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील महिला व बाल रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच अन्य पाच कर्मचाºयांनाही नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे सदर रूग्णालय लवकरच सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या इंदिरा गांधी चौकाजवळ महिला व बाल रूग्णालयाची प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे काम दोन वर्षांपूर्वीच जवळपास पूर्ण झाले आहे. या ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांच्या नेमणुकीला शासनाने मंजुरीही दिली आहे. मात्र अजूनपर्यंत या ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी नेमले नव्हते. सार्वजनिक आरोग्य विभागाने महाराष्टÑ वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ मधील जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातील ६९ वैद्यकीय अधीक्षकांच्या नव्याने पदस्थापना केल्या आहेत. त्यात विनंतीनुसार डॉ. दीपचंद सोयाम यांची महिला रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच अन्य पाच कर्मचाºयांनाही नेमणूक देण्यात आली आहे.
या रूग्णालयासाठी १०० च्या जवळपास पदे मंजूर आहेत. ही सर्व पदे भरल्याशिवाय रूग्णालयाचा कारभार चालणे कठीण होणार आहे. केवळ वैद्यकीय अधीक्षक व पाच आरोग्य कर्मचाºयांच्या भरवशावर १०० खाटांचे रूग्णालय असलेल्या महिला रूग्णालयाचा भार सांभाळणे कठीण आहे. त्यामुळे या ठिकाणी इतरही कर्मचाºयांची नेमणूक करणे गरजेचे आहे.
रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे बाहेरून दिसत असले तरी काही खोल्यांचे आतील काम अजूनही शिल्लक आहे. मात्र कंत्राटदाराने या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. रूग्णालय सुरू होण्यासाठी सदर काम पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. विशेष म्हणजे, महिला व बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी विविध प्रकारची महागडी साधनसाम्रगी लागते. मात्र सदर साहित्यही अजूनपर्यंत रूग्णालयला उपलब्ध झाले नाही. उर्वरित पदभरती करून साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
शशिकांत शंभरकर नवीन डीएचओ
जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. कमलेश भंडारी यांची भंडारा येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर डॉ. शशिकांत शंभरकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. यापूर्वी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याकडे मागील साडेतीन वर्षांपासून जिल्हा माता व बाल संगोपन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांना येथील आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास आहे.