..अन् तासाभरात होऊ घातलेला बालविवाह थांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 12:55 PM2022-02-10T12:55:00+5:302022-02-10T13:02:47+5:30

गडचिरोलीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सेमाना देवस्थानात एक बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण चमू आणि चाइल्डलाइन चमूने बालकांचे गाव व त्यांचे घर गाठले.

child marriage that was about to happen within an hour stopped by child line and gadchiroli police | ..अन् तासाभरात होऊ घातलेला बालविवाह थांबविला

..अन् तासाभरात होऊ घातलेला बालविवाह थांबविला

Next
ठळक मुद्देवेळेवर सेमाना देवस्थानात पोहोचले बाल संरक्षण चमूसह पोलीससंबंधितांना दिली तंबी

गडचिरोली : गडचिरोली शहरालगत सेमाना देवस्थानात बुधवारी दुपारी होऊ घातलेला अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह प्रशासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे रोखण्यात यश आले. एक तास उशीर झाला असता तर हा विवाह आटोपला असता.

बुधवारी गडचिरोलीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सेमाना देवस्थानात दुपारी एक वाजता एक बालविवाह होणार आहे, अशी गोपनीय माहिती सकाळी आठ वाजता प्रशासनाला मिळाली. लगेच जिल्हा बाल संरक्षण चमू आणि चाइल्डलाइन चमूने बालकांचे गाव व त्यांचे घर गाठून त्यांच्या जन्म पुराव्याची तपासणी केली. गोकुळनगरातील संबंधित बालक १८ वर्षांखालील असल्याची खात्री पटल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण चमूने बालिकेचे विसापूर येथील घर गाठले; पण तिथे कसलीच हालचाल दिसून आली नाही. मुलाच्या घरी गोकुळनगर येथेही काहीच हालचाल दिसून आली नाही.

चौकशी केली असता सेमाना देवस्थान येथे त्यांचे लग्न होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. माहितीची शहानिशा झाल्यानंतर गडचिरोली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक पूनम गोरे यांच्या उपस्थितीत सेमाना गाठण्यात आले. तिथे वर-वधू पक्षाकडील मंडळींना एकत्र बसवून बालविवाहाबाबतचे दुष्परिणाम आणि कायद्यानुसार होणारी कारवाई याबाबत सर्वांना माहिती देण्यात आली. त्यामुळे दोन्हीकडील मंडळींनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला.

संबंधित कार्यवाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, चाइल्डलाइनचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, तनोज ढवगये, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, नीलेश देशमुख, मनीषा पुप्पलवार, उज्ज्वला नाकाडे, पूजा धमाले, चाइल्डलाइन टीम मेंबर तृप्ती पाल, वैशाली दुर्गे, अविनाश राऊत यांनी विशेष सहकार्य केले.

मुलीच्या आईने दिले लग्न न करण्याचे हमीपत्र

या नियोजित लग्नातील मुलीचे वय १६ वर्षे ९ महिने असल्याचे दिसून आले. तिचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह करणार नाही, असे हमीपत्र मुलीच्या आईकडून लिहून घेण्यात आले. त्या बालिकेचेही समुपदेशन करण्यात आले. मुलीचे वय १८ वर्षे असल्याची खात्री केल्याशिवाय लग्नात मंडप टाकण्याचे काम घ्यायचे नाही, अशी तंबी मंडप डेकोरेशनच्या मालकास देण्यात आली. कुठेही बालविवाह होत असल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: child marriage that was about to happen within an hour stopped by child line and gadchiroli police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.