रस्त्याअभावी पोटातच दगावले बाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:04 AM2018-08-29T01:04:17+5:302018-08-29T01:07:55+5:30
तालुक्यातील पुस्के येथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गावातील गरोदर मातेला प्रसुतीसाठी रूग्णालयात भरती करण्यास उशीर झाल्याने बाळ दगावल्याची घटना घडली. पुस्के हे गाव एटापल्ली-गट्टा मार्गावर एटापल्लीपासून ३५ किमी अंतरावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील पुस्के येथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गावातील गरोदर मातेला प्रसुतीसाठी रूग्णालयात भरती करण्यास उशीर झाल्याने बाळ दगावल्याची घटना घडली.
पुस्के हे गाव एटापल्ली-गट्टा मार्गावर एटापल्लीपासून ३५ किमी अंतरावर आहे. एटापल्ली-गट्टा मार्गावर अडंगेगावापर्यंत मार्ग आहे. अडंगेगाव ते पुस्के गावामधील अंतर तीन किमी आहे. यादरम्यान रस्ता नसल्याने नागरिकांना जंगलातून पायवाटेचा आधार घेत अनेक लहान-लहान नाले पार करावे लागतात.
२० आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पुस्के येथील गरोदर माता चिमरी देवू लेकामी हिला पोटात वेदना होऊ लागल्या. गावातील दायी पाडे लेकामी हिने तब्येत तपासून तत्काळ रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. आशावर्कर सुनिता हिने तीन किमी अंतर पायी चालून सात किमी अंतरावरील जांभिया येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पोहोचली. याबाबतची माहिती सिस्टर दिला. तेथील सिस्टर सुरेखा महालदार यांनी स्वत:च्या कारने अडंगेपर्यंत पोहोचल्या. तेथून तीन किमी पायी चालत जाऊन गर्भवती मातेची तपासणी केली. गावातील रामकेवल बेक, गोटा, विनोद टोपा, विनोद दुर्वा या चार युवकांनी कंबरभर पाण्यातून गरोदर महिलेला तीन किमीपर्यंत खाटेवर बसवून आणले. कारने १० किमी अंतरावरील गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तेथून खासगी वाहनाने ३६ किमी अंतरावरील ग्रामीण रूग्णालय एटापल्ली येथे आणण्यात आले. एटापल्लीवरून पुन्हा अहेरी येथे हलविण्यात आले. अहेरी रूग्णालयात गरोदर मातेने मृत बाळाला जन्म दिला. गरोदर माता वेळेवर रूग्णालयात पोहोचली असती तर बाळ जीवंत असते. आरोग्य कर्मचारी व गावातील नागरिकांनी केलेली धडपड व्यर्थ गेली. त्यामुळे मृत बाळ जन्माला आल्याचे कळताच सर्वांनाच रडू कोसळले. चार दिवस अहेरी येथे चिमरी लेकामीवर उपचार केल्यानंतर २४ आॅगस्ट रोजी तिला सुटी देण्यात आली. अहेरीवरून तिला अडंगेपर्यंत वाहनाने सोडण्यात आले. मात्र पुन्हा तिन किमीपर्यंत चालतच जावे लागले. तालुक्यातील लोहखनिजाचे खनन करून खासगी कंपन्या मालामाल होत चालल्या आहेत. मात्र येथील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
धानाच्या बांध्यांमधून मार्ग
पुस्के गावाला जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता नाही. काही दूर अंतरापर्यंत धानाच्या बांध्यांमधून पायवाटेने जावे लागते. पुस्के गावातील शिक्षक दीपक नागपुरवार यांनी गावकऱ्यांच्या सहकार्यातून बांबूचा रस्ता तयार केला आहे. या बांबूवरूनही दुचाकी चालवितांना कसरत करावी लागते.