पाण्यासाठी गावात आलेला चितळ ठार
By admin | Published: April 12, 2017 01:06 AM2017-04-12T01:06:28+5:302017-04-12T01:06:28+5:30
येथील वीज वितरण कंपनी कार्यालयालगत असलेल्या आंबे तलावात पाण्याच्या शोधात तहाण भागविण्यासाठी आलेला ....
पाणवठे कोरडे : उष्णतामानाने होरपळताहेत वन्यजीव
वैरागड : येथील वीज वितरण कंपनी कार्यालयालगत असलेल्या आंबे तलावात पाण्याच्या शोधात तहाण भागविण्यासाठी आलेला चितळ जखमी झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी रविवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास वैरागड वन क्षेत्रात घडली. या चितळाचा दोन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वीज वितरण कार्यालय लगतच्या आंबे तलावात तहाण भागविण्यासाठी आलेल्या चितळाची कोणी तरी शिकार करण्याच्या प्रयत्नात चितळाला दगड मारून जखमी केले. उपचारादरम्यान दोन दिवसांनी चितळ ठार झाला. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात येणाऱ्या वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे.
९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास वैरागड वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७४२ मध्ये जखमी अवस्थेत पडून असलेला १० महिने वयाचा चितळाचा पाडस काही व्यक्तींच्या दृष्टीस पडला. संबंधित व्यक्तीने याबाबतची माहिती वन विभागाला दिली. वैरागड येथील क्षेत्र सहायक मेश्राम, वनरक्षक श्रीकांत सेलोटे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमी चितळाला बेस्ट स्टेशनला आणले. मात्र वैरागडचे पशुधन विकास अधिकारी नसल्याने या जखमी चितळावर उपचार करण्यासाठी दुपारचे २ वाजले. चितळाच्या पाठीवरचा हाड मोडला असल्याने दोन दिवसांच्या उपचारानंतर चितळाचा मृत्यू झाला.
सध्या वैरागड, मानापूर, सुकाळा, कुरंडी, मोहझरी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलाला आगी लागल्या आहेत. या आगीत वन्यजीव त्याच ठिकाणी होरपळून मरतात. अथवा जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटतात. अशावेळी मोकळ्या जागेचा अथवा लोकवस्तीचा वन्यप्राणी आसरा घेतात. मात्र अशा ठिकाणी सुध्दा वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. वैरागड जंगलात जखमी झालेल्या चितळाबाबत असाच प्रकार घडला असल्याची शक्यता आहे. (वार्ताहर)