शेतकऱ्यांची ट्रॅक्टरलाच पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 01:11 AM2018-10-07T01:11:59+5:302018-10-07T01:12:55+5:30
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेती उपयोगी यंत्र सामुग्री व साहित्य अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. मात्र सर्वाधिक शेतकरी ट्रॅक्टरलाच पसंती दर्शवित असल्याचे दिसून येत असून यावर्षी १२०० पेक्षा अधिक अर्ज केवळ ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी उपलब्ध झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेती उपयोगी यंत्र सामुग्री व साहित्य अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. मात्र सर्वाधिक शेतकरी ट्रॅक्टरलाच पसंती दर्शवित असल्याचे दिसून येत असून यावर्षी १२०० पेक्षा अधिक अर्ज केवळ ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी उपलब्ध झाले आहेत.
आधुनिक पध्दतीने शेती करायची असेल तर त्यासाठी यंत्र सामुग्री असणे आवश्यक आहे. मात्र यंत्र सामुग्रीची किंमत लाखो रूपये राहत असल्याने सर्वसाधारण शेतकरी एवढे महागडे साहित्य खरेदी करू शकत नाही. संबंधित साहित्य खरेदीवर काही अनुदान उपलब्ध करून दिल्यास शेतकरी साहित्य खरेदी करेल. या उद्देशाने शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. धानाची चिखलणी करावी लागते. चिखलणीचे काम बैलांच्या मदतीने केले जात असले तरी सदर काम अतिशय कष्टदायक आहे. त्याचबरोबर रोवणीचा कालावधी सुध्दा लागतो. ट्रॅक्टरच्या सहाय्याने मात्र चिखल चांगले होते. त्याचबरोबर ट्रॅक्टरच्या मदतीने इतरही शेतीउपयोगी कामे करता येत असल्याने अनुदानांतर्गत इतर साहित्यांपेक्षा शेतकरी ट्रॅक्टरलाच अधिक पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.
शेतकºयांना यंत्रसामुग्री व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण, उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना या तीन योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत ट्रॅक्टर, रोटोवेटर, पेरणी यंत्र, कल्टीवेटर, दालमिल आदी यंत्र उपलब्ध करून दिली जातात. मात्र सर्वाधिक शेतकरी ट्रॅक्टरचीच मागणी करीत असल्याचे दिसून येते.
यावर्षी कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत केवळ १९ ट्रॅक्टरचे लक्षांक प्राप्त झाले आहे. मात्र जिल्हाभरातील १ हजार २०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठीच अर्ज केला असल्याचे दिसून येते. १९ ट्रॅक्टरच्या लक्षांकापैकी प्रत्येक तालुक्याला एक ते दोनच ट्रॅक्टरचे लक्षांक देण्यात आले आहे. त्यासाठी मात्र प्रत्येक तालुक्यात १०० च्या जवळपास अर्ज प्राप्त झाले आहेत. इतर अवजारांसाठी मात्र अत्यंत कमी अर्ज प्राप्त झाले आहेत.
मागील वर्षी ४४४ ट्रॅक्टरचे वितरण
मागील वर्षी जिल्हाभरात सुमारे ४४४ ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर २७ रोटावेटर, १९ मळणी यंत्र, एक पेरणी यंत्र, तीन कल्टीवेटर, एक दालमिलचे वितरण झाले. यावर्षी मात्र कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत केवळ १९ ट्रॅक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याचबरोबर १० पॉवर टिलर, ३६ रोटावेटर, चार पेरणी यंत्र, चार रिपर, सहा मनुष्यचलित पीक संरक्षण यंत्र, एक प्रक्रिया यंत्राचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उद्दिष्ट कमी आहे. त्यातचही ट्रॅक्टरचे उद्दिष्ट कमी असल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. काही तालुक्यांमध्ये सोडतीला सुरूवात झाली आहे. यावर्षी केवळ कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर उपलब्ध झाले आहे. इतर योजनांमधून ट्रॅक्टर उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांनी केलेले अर्ज ३१ मार्च २०१९ पर्यंत वैध आहेत. सुरूवातीचे लक्षांक पूर्ण झाल्यानंतर आणखी लक्षांक उपलब्ध होईल. गडचिरोली जिल्ह्यातून सर्वाधिक ट्रॅक्टरची मागणी झाली आहे. त्यामुळे यानंतरचे प्राप्त होणारे लक्षांक हे ट्रॅक्टरसाठीच राहण्याची शक्यता आहे.
- अनंत पोटे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी