चांदाळात चौकाचे झाले नामकरण
By admin | Published: November 9, 2016 02:37 AM2016-11-09T02:37:40+5:302016-11-09T02:37:40+5:30
ठाकूर रामप्रसाद पोटाई यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोंडवाना गोंडी संस्कृती बचाव समितीच्या वतीने रविवारी आयोजित
गोंडवाना बचाव समितीतर्फे कार्यक्रम : ठाकूर रामप्रसाद पोटाई यांचे दिले नाव
गडचिरोली : ठाकूर रामप्रसाद पोटाई यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोंडवाना गोंडी संस्कृती बचाव समितीच्या वतीने रविवारी आयोजित कार्यक्रमात चांदाळा टोला येथील मुख्य चौकाचे ठाकूर रामप्रसाद पोटाई असे नामकरण करण्यात आले. चांदाळा टोला येथील मुख्य चौकाचे संविधान सभेचे सदस्य असलेल्या ठाकूर रामप्रसाद पोटाई यांचे नाव या चौकाला देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवशहा टेकाम होते. उद्घाटक म्हणून माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत मडावी, जिल्हाध्यक्ष संदीप वरखडे, मुर्सेनाल खुशालसिंह सुरपाम, गोंडीधर्म बचाव समितीचे अध्यक्ष मनिरावण दुग्गा, अॅड. सुखरंजन उसेंडी, साहित्यिक नंदकिशोर नैताम, प्रा. मधुकर उईके, आरखी, चांदाळा आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी, बिच्चु वड्डे, सरपंच राजेंद्र मेश्राम, श्रीराम नैैताम, डॉ. पीतांबर कोडापे, गोपाल नैैताम, बालविकास अधिकारी मुनेश्वर करंगामी, क्रांती केरामी आदी मान्यवर उपस्थित होते.
सहावी व सातवी अनुसूचि भारतीय संविधानात लागू करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, असे ठाकूर रामप्रसाद पोटाई यांचे नाव चांदाळा टोला येथील मुख्य चौकाला देण्यात आले. त्यांच्या नावाचा फलकही लावण्यात आला. याप्रसंगी वासुदेवशहा टेकाम म्हणाले, गोंडवानाच्या पुनरूत्थानासाठी गोंडवाना राज्याची निर्मिती व्हावी, याकरिता संविधान निर्मितीकरिता रामप्रसाद पोटाई यांनी भरीव कार्य केले, असे त्यांनी सांगितले.
गोंडी संस्कृती ही या देशाची आद्य संस्कृती आहे. तिचे संवर्धन होणे काळाची गरज आहे, असे श्यामकांत मडावी यांनी सांगितले. गोंडी संस्कृतीचे पालन प्रत्येकाने आचरणात आणावे, रामप्रसाद पोटाई यांचा भारतीय संविधान बनविण्यात मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याची पे्ररणा घेऊन आदिवासी बांधवांनी जीवनात वाटचाल करावी, असे माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी भाषणातून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर नैैताम, संचालन गणेश हलामी यांनी केले तर आभार उत्तम आतला यांनी मानले. यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले. चांदाळा परिसरातील हजारो आदिवासी बांधव हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)