चुडीयालची शाळा भरते समाजभवनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:03 AM2019-09-10T00:03:59+5:302019-09-10T00:04:20+5:30
चुडीयाल येथील जि.प.शाळेत इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून ही शाळा दोन शिक्षकी आहे. सदर शाळा इमारत मोडकळीस आल्यानंतर येथील शिक्षकांनी वऱ्हाड्यात वर्ग भरविणे सुरू केले. पावसाळ्यातील धोका लक्षात घेऊन ही शाळा, त्यानंतर नजीकच्या अंगणवाडीत स्थलांतरित झाली. दरम्यान शाळेची व अंगणवाडी केंद्रातील मुले, मुली एकत्र बसू लागल्याने अध्यापनाच्या कार्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे या शाळेचे वर्ग उन्हाळ्यात चिंचेच्या झाडाखाली भरविण्यात येऊ लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत धानोरा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर चुडीयाल येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. मात्र येथील जुनी जीर्ण इमारत निर्लेखित केल्यानंतर नवी इमारत बांधण्यात आली नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून येथील शाळा बेघर झाली असून सध्या ही शाळा समाजभवनाच्या अपूर्ण इमारतीत भरविली जात आहे.
चुडीयाल येथील जि.प.शाळेत इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून ही शाळा दोन शिक्षकी आहे. सदर शाळा इमारत मोडकळीस आल्यानंतर येथील शिक्षकांनी वऱ्हाड्यात वर्ग भरविणे सुरू केले. पावसाळ्यातील धोका लक्षात घेऊन ही शाळा, त्यानंतर नजीकच्या अंगणवाडीत स्थलांतरित झाली. दरम्यान शाळेची व अंगणवाडी केंद्रातील मुले, मुली एकत्र बसू लागल्याने अध्यापनाच्या कार्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे या शाळेचे वर्ग उन्हाळ्यात चिंचेच्या झाडाखाली भरविण्यात येऊ लागले. पुन्हा येथेही झाडावरचे कीटक, पालापाचोळा अंगावर पडत असल्याने व पावसाळा सुरू झाल्याने ही शाळा ग्रामपंचायतीच्या इमारतीत भरविण्यात येऊ लागली. ग्रा.पं.चा कारभार एका कोपऱ्यात व शाळेचा कारभार दुसºया कोपºयात असे सुरू होते. येथे दोन्ही यंत्रणेला अडचणी येऊ लागल्याने त्यानंतर ही शाळा गावातीलच अधर्वट बांधकाम झालेल्या समाजभवनाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली. तेव्हापासून ही शाळा याच इमारतीत भरत आहे. समाजभवनाच्या इमारतीला दरवाजे व खिडक्या बसविण्यात आले नाही. केवळ स्लॅबच्या खाली विना प्लास्टरच्या इमारतीत शाळेचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विना प्लास्टरच्या शाळेत शैक्षणिक साधने व साहित्याचा वापर करता येत नाही. ही इमारत खुली असल्याने येथे मोकाट जनावरे, डुकरांचा हैदोस असतो. परिणामी येथे रात्रीच्या सुमारास घाण निर्माण होते. कशीबशी स्वच्छता करून पुन्हा येथेच वर्ग बसविले जातात.
जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन सुस्त
ग्रामपंचायतीचे गाव असलेल्या चुडीयाल येथे इयत्ता पहिली ते चवथीपर्यंतची शाळा असून या शाळेला स्वतंत्र इमारत नाही. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊन शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली. मात्र नवी शाळा इमारत मंजूर करून ती बांधण्यासाठीची कुठलीही कार्यवाही जि.प.व पं.स.प्रशासनाकडून अद्यापही करण्यात आली नाही. नव्या शाळा इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले नसून येथील विद्यार्थी व पालकांवर अन्याय होत आहे.