धानोरा तालुक्यातील आरोग्य सेवेवर मंथन
By admin | Published: March 22, 2017 02:25 AM2017-03-22T02:25:08+5:302017-03-22T02:25:08+5:30
स्पर्श संस्थेच्या वतीने धानोरा येथील किसान भवनात तालुकास्तरीय आरोग्य हक्क जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
समस्या सोडविण्याचे सभापतींचे आश्वासन : रांगी, कारवाफा, मुरूमगाव केंद्रांबाबत व्यक्त केली चिंता
धानोरा : स्पर्श संस्थेच्या वतीने धानोरा येथील किसान भवनात तालुकास्तरीय आरोग्य हक्क जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सभेत रांगी, कारवाफा व मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेवर चर्चा करण्यात आली.
जनसंवाद सभेच्या अध्यक्षस्थानी धानोरा पंचायत समितीचे सभापती अजमन राऊत उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती अनुसया कोरेटी, पंचायत समिती सदस्य विलास गावडे, सदस्य कविता मंटकवार, नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, भाऊसाहेब अहीर, आम्ही आमच्या आरोग्यासाठीच्या संचालक शुभदा देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश मडावी उपस्थित होते. डॉ. दिलीप बारसागडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानांची दैनावस्था, जननी सुरक्षा लाभ योजनेंतर्गत डावलण्यात येणारा आर्थिक लाभ, आरोग्य सेवकांची दवाखान्यातील अनुपस्थिती, आशा वर्करला मिळणारे अत्यल्प मानधन आदी मुद्दे मांडले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मडावी, डॉ. गौरशेट्टीवार, डॉ. पाटील, डॉ. पुंगाटी, डॉ. जाधव यांनी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
धानोरा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पंचायत समितीचे सभापती अजमन राऊत यांनी सांगितले. शुभदा देशमुख यांनी आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. संचालन सुकलू कोरेटी तर आभार सचिन जेठी यांनी मानले. यशस्वीतेसाठी हरीराम धुर्वे, पवन ठाकरे, मनोज तुलावी, अमोल सहारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)