‘तारुण्यभान ते समाजभान’वर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:54 AM2018-02-22T00:54:00+5:302018-02-22T00:55:34+5:30

Churning on 'Tuneyabhavan to Soci Bhavan' | ‘तारुण्यभान ते समाजभान’वर मंथन

‘तारुण्यभान ते समाजभान’वर मंथन

Next
ठळक मुद्देसर्चमध्ये निर्माण शिबिराचा समारोप : देशभरातील ६५ वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग

ऑनलाईन लोकमत
धानोरा : तालुक्यातील चातगाव नजीकच्या सर्च शोधग्राम येथे निर्माण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील ६५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या शिबिरात तारुण्यभान ते समाजभान या विषयावर मंथन करण्यात आले.
मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूरसह महाराष्ट्रातील १३ शासकीय महाविद्यालयच नव्हे तर गुजरात, उत्तरप्रदेश, तामिलनाडू व मध्यप्रदेश येथील वैद्यकीय विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. ‘अर्थपूर्ण जिवनाचा समाजात शोध’ ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून सुरू झालेल्या निर्माणच्या आठव्या सत्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचे पहिले शिबिर १० ते १८ फेब्रुवारीदरम्यान पार पडले. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या व प्रश्नांबाबत या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अस्वस्थेवर या शिबिरात मार्ग शोधण्याचा प्रयत्न झाला.
वैद्यकीय विद्यार्थी म्हटला की, त्याला शारीरिक रचना, त्यात होणारे बदल याची माहिती असतेच. मात्र लैंगिक जाणीव काय, माझा जोडीदार कसा असावा, माझ्या स्वंचा स्वीकार कसा करतो, याशिवाय घरच्या कुटुंबियांसोबत माझा संवाद होतो काय, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे डॉ. राणी बंग यांनी तारुण्यभान विषयावर मार्गदर्शन करताना वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिली. स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांनी स्पाईन फाऊंडेशनच्या संपूर्ण चळवळीची माहिती शिबिरार्थ्यांना दिली. गडचिरोली तसेच देशभरातील दुर्गम भागात स्पाईन सर्जरी करताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. सुनील चव्हाण यांनी जागतिक आर्थिक विषमतेवर कशी मात करता येऊ शकते, यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. योगेश कालकोंडे यांनी अमेरिका ते गडचिरोली हा वैद्यकीय प्रवास कसा झाला, यावर आपले अनुभव कथन केले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी महावाडा, मेंढाबोदली, लेखामेंढा, आंबेशिवणी, फुलबोडी, चांदाळा, रेखाटोला, बामणी आदी गावांना भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. या ग्रामीण भागात नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावतात, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
सकारात्मक दृष्टिकोन हवा
शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिबिरातून नेमके काय शिकायला मिळाले, हे त्यांनी सांगितले. जीवनाकडे पाहण्याचा खरा दृष्टिकोन मला सापडला, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास मदत झाली, असे हर्ष जोगी या विद्यार्थ्याने सांगितले. स्वत:मध्ये आत्मविश्वास वाढला, असे अवनी पटेल यांनी म्हणाले.

Web Title: Churning on 'Tuneyabhavan to Soci Bhavan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.