दुसऱ्याही दिवशी एटापल्लीत नागरिकांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:19 AM2019-08-18T00:19:47+5:302019-08-18T00:20:35+5:30
विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका अन्यायविरोधी संघर्ष समितीच्यावतीने १६ आॅगस्टपासून एटापल्ली शहर बंद ठेवले आहे. दुसºयाही दिवशी १७ आॅगस्ट रोजी एटापल्ली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात शालेय विद्यार्थी, दुकानदार, सामान्य नागरिकांनी संयस्फूर्तीने सहभाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका अन्यायविरोधी संघर्ष समितीच्यावतीने १६ आॅगस्टपासून एटापल्ली शहर बंद ठेवले आहे. दुसºयाही दिवशी १७ आॅगस्ट रोजी एटापल्ली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात शालेय विद्यार्थी, दुकानदार, सामान्य नागरिकांनी संयस्फूर्तीने सहभाग घेतला.
एटापल्ली तालुक्याचा विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे जारावंडी तालुक्याची निर्मिती करावी. तसेच अहेरी जिल्हा निर्माण करावा. स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाने केंद्र शासनाकडे सादर करावा. वीज बिल निम्मे करावे. बीएसएनएल सेवेचा दर्जा सुधारावा, एटापल्लीतील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान महाविद्यालय सुरू करावे. एटापल्ली येथील बंद केलेले मॉडेल स्कूल पुन्हा सुरू करावे. आदी मागण्यांचे निवेदन शासनाला सादर केले होते. मागण्या मान्य न झाल्यास १६ आॅगस्टपासून एटापल्ली बंद ठेवण्याचा इशारा दिला होता.
शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ठरलेल्या नियोजनानुसार एटापल्लीतील नागरिकांनी १६ आॅगस्टपासून एटापल्ली बंदचे आंदोलन सुरू केले. १६ आॅगस्ट रोजी शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ बंद ठेवून बसस्थानक परिसरात ठिय्या आंदोलन केले. शनिवारीही आंदोलन सुरूच होते. शनिवारी मेडीकलसुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या आंदोलनात नागरिक व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे.
पानठेल्यांपासून तर मोठमोठी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. आंदोलन शांतपणे सुरू आहे. आंदोलनाची दखल न घेतल्या चक्काजाम, जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
नायब तहसीलदारांनी आंदोलनाला दिली भेट
आंदोलनाची दखल घेत एटापल्लीचे नायब तहसीलदार एस. पी. कडार्लावार यांनी शनिवारी आंदोलन स्थळाला भेट दिली. आंदोलकांसोबत चर्चा केली. आंदोलकांनी केलेल्या मागण्यांमधील बहुतांश मागण्या वरिष्ठ स्तरावरील आहेत. उपविभागीय अधिकारी सुध्दा आंदोलनाला भेट देऊन चर्चा करतील, अशी माहिती कडार्लावार यांनी आंदोलकांना दिली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनही हादरले आहे.