आलापल्ली, नागेपल्लीत धुरामुळे नागरिक त्रस्त
By admin | Published: April 13, 2017 02:43 AM2017-04-13T02:43:36+5:302017-04-13T02:43:36+5:30
आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या आलापल्ली वनपरिक्षेत्रातील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला
आलापल्ली : आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या आलापल्ली वनपरिक्षेत्रातील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून यामुळे आलापल्ली व नागेपल्ली परिसरातील गावात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आहे. त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यांना जळजळ होण्याचा त्रास वाढला आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून आलापल्लीच्या परिसरातील जंगलात आग मोठ्या प्रमाणावर पसरली असून ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आलापल्ली वन विभागात दरवर्षी तेंदू तोडणी हंगाम सुरू होण्या व्हायच्या आधी दरवर्षी साधारणत: मार्च, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जंगलाला आगी लागण्याच्या घटना घडतात. तेंदूच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर नवीन व दर्जेदार पाने फुटतात, असा या मागे तर्क आहे. मात्र या आगीमुळे पक्षी, प्राणी, सरपटणारे जनावरे यांना प्रचंड त्रास होत आहे. अनेक पशु, पक्षी या आगीच्या लोळात मारलेही जातात. वन विभागाचे अनेक कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी नित्याने प्रयत्न करीत असले तरी आगी लागण्याचे प्रमाण मोठे असल्याने त्यांनाही आगी विझविण्यासाठी कुठे-कुठे जावे, हा प्रश्न निर्माण होतो. वरिष्ठ अधिकारी मात्र या आगीच्या घटनांकडे फार गांभीर्याने लक्ष देत नाही. उलट त्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच आग लागल्यास कारवाई करू, असा दम दिलेला आहे. त्यामुळे आग विझविण्याचे काम करणारे कर्मचारी प्रचंड मानसिक तणावात असल्याचे दिसून येत आहे.
आलापल्ली वनपरिक्षेत्रात सुनील प्रेमानंद बिश्वास रा. कांकेर, जि. करेनर (छत्तीसगड) याला अटक करण्यात आली. त्याला परप्रांतीय तेंदू ठेकेदारांनी आणले होते. हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे अहेरी वनपरिक्षेत्रातही जंगलाला आग लावताना प्रभाष गोपाल मंडल, आशितोष किशोर कोरेत रा. अहेरी या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक नागरिकांचाही सहभाग आग लावण्यात असल्याचे स्पष्ट झाले. जंगलातील आगीमुळे आलापल्ली, नागेपल्ली भागात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांना डोळ्यांचा जळजळीचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. वन विभागाने यासंदर्भात तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांच्या भ्रमणध्वनीवर प्रतिक्रियेसाठी संपर्क केला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आग वाढत असल्याने जंगलाला धोका होण्याची शक्यता असून नागरिकांनाही डोळ्यांचा त्रास व आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)