तलावाच्या पाळीचे काम बंद केल्याने नागरिक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 09:57 PM2019-06-29T21:57:46+5:302019-06-29T21:58:05+5:30
चामोर्शी शहराच्या प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ परिसरात दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रशासनातर्फे पावसाळ्यात फुटलेल्या नागोल तलावाची पाळ बांधकामास सुरूवात करण्यात आली. मात्र अर्धे काम झाल्यानंतर हे काम अचानक बंद पाडण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी २९ जून रोजी शनिवारला चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी शहराच्या प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ परिसरात दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रशासनातर्फे पावसाळ्यात फुटलेल्या नागोल तलावाची पाळ बांधकामास सुरूवात करण्यात आली. मात्र अर्धे काम झाल्यानंतर हे काम अचानक बंद पाडण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी २९ जून रोजी शनिवारला चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपविभागीय अधिकारी विजया जाधव यांनी स्वीकारले. तर नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारी संजय गंगथडे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देताना पी. जे. सातार, एच. डब्ल्यू. उत्तरवार, कोपेश्वर लडके, एस. एस. घागरे, व्ही. एन. सालेकर, आर. जी. वासेकर, के. डी. बोबाटे, आर. एन. धोडरे, संजय कुनघाडकर, महेंद्र वासेकर, कालिदास बुरांडे, गजानन बारसागडे आदीसह साधूबाबा नगर प्रभाग क्रमांक १३, गणेश नगर प्रभाग क्रमांक १२ व १३, प्रभाग क्रमांक १३ मधील आॅफीसर कॉलनी तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील गायत्री नगरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
येत्या सोमवारपासून तलावाच्या पाळीचे काम पूर्ववत सुरू करण्याबाबतची माहिती आपण नगराध्यक्षांना दिली असून या पाळीचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी तथा तहसीलदार संजय गंगथडे यांनी नागरिकाच्या शिष्टमंडळांना चर्चेदरम्यान सांगितले.
६ जुलैला मोर्चा काढणार
साधूबाबा नगराजवळील नागोल तलावाच्या पाळीचे बांधकाम सुरू करून ते पूर्ण करण्यात यावे, अन्यथा ६ जुलै रोजी नगर पंचायत कार्यालयावर मोर्चा काढणार, असा इशारा साधूबाबा नगर, गणेश नगर, गायत्री नगर व आॅफीसर कॉलनीतील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. निवेदनाची प्रत जलसंपदामंत्री, विरोधी पक्ष नेते, खासदार व आमदारांना पाठविण्यात आली आहे.