कोनसरी प्रकल्पावर नागरिकांचे एकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 06:00 AM2019-08-22T06:00:00+5:302019-08-22T06:00:12+5:30

लॉयड्स मेटल्स अ‍ॅन्ड एनर्जी लिमीटेडच्या या लोहखनिज प्रकल्पासाठी कोनसरी येथील जागा दोन वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आली होती. सदर कंपनीला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील जागा लोहखनिज काढण्यासाठी सरकारने लिजवर दिली आहे.

Citizens' Consensus on the Konsari Project | कोनसरी प्रकल्पावर नागरिकांचे एकमत

कोनसरी प्रकल्पावर नागरिकांचे एकमत

googlenewsNext
ठळक मुद्देजनसुनावणीत गर्दी : क्षेत्राच्या विकासाला देणार चालना

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील कोनसरी येथे उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाच्या जनसुनावणीत परिसरातील सर्व नागरिकांनी एकमताने या प्रकल्पाला सहकार्य करण्याची हमी देत प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची एकमुखी मागणी केली. या सुनावणीला मोठ्या संख्येने चामोर्शीसह एटापल्ली तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
लॉयड्स मेटल्स अ‍ॅन्ड एनर्जी लिमीटेडच्या या लोहखनिज प्रकल्पासाठी कोनसरी येथील जागा दोन वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आली होती. सदर कंपनीला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील जागा लोहखनिज काढण्यासाठी सरकारने लिजवर दिली आहे. परंतू नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल भाग असल्यामुळे लोहखनिजावरील प्रक्रिया उद्योगासाठी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील जागा निवडण्यात आली. दरम्यान त्या भागातील पर्यावरणविषयक समस्या जाणून घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी कोनसरीत जनसुनावणी ठेवली होती. यावेळी चंद्रपूर प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मधुकर लाड, चामोर्शीचे तहसीलदार गंगथडे, लॉयड् मेटल्स कंपनीचे उपाध्यक्ष अतुल खाडीलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या जनसुनावणीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रकल्पाची माहिती उपस्थितांना दिली. त्यात या क्षेत्राच्या विकासात्मक सोयीसुविधांसाठी २.२५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या परिसरातील नागरिक व बेरोजगारांनी संबंधित अधिकाऱ्यापुढे आपली व्यथा मांडताना प्रकल्प लवकर सुरू करून बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली.
एटापल्लीतील बेरोजगारांना प्राधान्य द्या
या जनसुनावणीला एटापल्ली तालुक्यातूनही मोठ्या संख्येने बेरोजगार उपस्थित होते. हा प्रकल्प आमच्या तालुक्यातच घ्या अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा मांडली. परंतू नक्षल अडचणीमुळे त्या भागात प्रकल्प लावण्यास मान्यता मिळाली नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी या तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांना कोनसरीच्या प्रकल्पात नोकरी देण्यास प्राधान्य देण्याची मागणी केली. त्याला संबंधितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Web Title: Citizens' Consensus on the Konsari Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.