नागरिक पाणीपुरवठ्यापासून वंचित
By admin | Published: November 4, 2016 12:22 AM2016-11-04T00:22:27+5:302016-11-04T00:22:27+5:30
देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दोन कोटी रूपये किंमतीची अतिरिक्त
पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर : दोन कोटींची अतिरिक्त पाणी योजना निरूपयोगी
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दोन कोटी रूपये किंमतीची अतिरिक्त पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र करण्यात आलेली कामे पूर्णत: सदोष असून नळ पाईपलाईन व इतर कामे अद्यापही अपूर्ण आहेत. परिणामी कुरूड गावाच्या काही भागात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे नव्या अतिरिक्त योजनेची टाकी व जलशुद्धीकरण केंद्राचे काम करण्यात आले. मात्र नळ पाणीपुरवठ्यासाठी जुन्याच टाकीचा वापर केला जात असल्याचे वास्तव आता उजेडात आले आहे.
कुरूड गावची लोकसंख्या ५ हजार ६६२ इतकी आहे. या गावात १ लाख ८० हजार लीटर क्षमतेची नळ पाणीपुरवठा योजना पूर्वीच कार्यान्वित करण्यात आली. या जुन्या नळ योजनेंतर्गत एकूण ४१४ लाभार्थ्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र अद्यापही ७५ टक्के कुटुंब सदर पाणीपुरवठा योजनेपासून वंचित आहेत. कुरूड गावातील सदर पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी येथे अतिरिक्त नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली. त्यानंतर प्रशासनाने तब्बल दोन कोटी रूपये किंमतीची कुरूड येथे अतिरिक्त नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत येथे टाकी व जलशुद्धीकरण यंत्रणेचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र उर्वरित कामे शिल्लक असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासाऱ्या प्रश्नांबाबत ग्रामपंचायत प्रशासन कमालीचे उदासीन असल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दोन कोटी रूपये किंमतीच्या अतिरिक्त नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत कुरूड येथे दोन लाख लीटर पाणी क्षमतेची अतिरिक्त टाकी, नळ पाईपलाईन, इन्टेक व्हेल, मुख्य वॉल्व, जॉकवेल, प्युवर वॉटर सप्लायर, वॉटर फिल्टर, वॉटर रेसिंग, वॉटर ट्रिटमेंट प्लॅन, डिस्ट्रीब्युशन प्लेनर आदी कामे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली होती.
पाणीटाकी व जलशुद्धीकरण यंत्रणेचे काम पूर्ण झाल्यानंतर नव्याने बांधण्यात आलेल्या अतिरिक्त टाकीमध्ये वाढीव भागासाठी पाणी सोडण्यात येत नाही. जुन्या नळ योजनेच्या टाकीत पाणी सोडले जात असल्याने नव्या अतिरिक्त पाणी योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जलशुद्धीकरण यंत्रणा व पाणीटाकीच्या बांधकामात अनियमितता दिसून येत असून कामाचा दर्जा सदोष असल्याचे कामाच्या स्थितीवरून दिसून येत आहे.
नव्या अतिरिक्त पाणी योजनेंतर्गत स्वतंत्र पाणी टाकी व जलशुद्धीकरण केंद्र होणार असल्याने मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होईल, या आशेने गावातील नागरिकांनी आपल्या घरी मोठ्या प्रमाणात नळ जोडणी घेतली. मात्र सद्य:स्थितीत अनेक घरातील नळाला अत्यल्प प्रमाणात पाणी नळाद्वारे येत आहे. त्यामुळे जशुद्धीकरण केंद्र व पाणीटाकी तसेच पाईपलाईनच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी कुरूडवासीयांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)