धोकादायक विहिरीतून नागरिक भरतात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:10 AM2018-05-11T00:10:42+5:302018-05-11T00:10:42+5:30
तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वाघभूमी येथील नागरिकांना जीवघेण्या विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वाघभूमी येथील नागरिकांना जीवघेण्या विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.
वाघभूमी येथे तीन सार्वजनिक विहिरी आहेत. यातील एका विहिरीचे दोन वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. परंतु येथील विहिरीचे पाणी वापरताना नागरिकांनी अद्यापही वापरले नाही. विशेष म्हणजे विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या विहिरीतील बांधकामाचे सेंट्रिंग अद्यापही काढण्यात आले नाही. उर्वरीत दोन विहिरीचे पाणी ग्रामस्थांची तहान भागतांना दिसून येत नाही. त्यामुळे गावातीलच नागरिक या विहिरीतील गाळ काढून आपली तहान भागवित आहेत. विहिरीच्या तोंडी लगतचा भाग पूर्णत: खचलेला असतानाही नागरिक येथील पाणी भरत आहेत. अजाणतेपणे पाय घसरल्यास येथे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच स्थितीत स्थानिकांना या विहिरीचे पाणी जीव मुठीत घेऊन वापरावे लागत आहे. विशेष म्हणजे विहिरीवरील प्लॅटफार्मला तब्बल १० फुटाचे भगदाड पडले असून तब्बल पाच महिन्यांपासून याच जीवघेण्या विहिरीतील पाणी स्थानिकांना प्यावे लागत आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. या विहिरीची दुरूस्ती न झाल्यास यंदाच्या पावसाळ्यातसुद्धा येथील नागरिकांना याच विहिरीतून पाणी काढावे लागणार आहे. पावसाळ्यात दलदल वाढून ओली माती जमिनीत दबण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या विहिरीच्या तोंडीची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.