नागरिकांनी जंगलात प्रवेश करू नये
By admin | Published: May 21, 2017 01:31 AM2017-05-21T01:31:38+5:302017-05-21T01:31:38+5:30
आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, अरसोडा, कासवी, कोंढाळा, मुल्लुर, कनेरी या क्षेत्रात दीड महिन्यापासून वाघाचे वास्तव्य आहे.
वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे आवाहन : वाघाचा वावर वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, अरसोडा, कासवी, कोंढाळा, मुल्लुर, कनेरी या क्षेत्रात दीड महिन्यापासून वाघाचे वास्तव्य आहे. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दोन इसमांना जीव गमावावा लागला आहे. वाघाचा वावर वाढला असल्याने नागरिकांनी जंगलात जाऊ नये, असे आवाहन आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी केले आहे.
अरसोडा, रवी, कोंंढाळा, कासवी परिक्षेत्रात वैनगंगा नदी, नाले, वनतलाव, इटियाडोहाचे बारमाही वाहणारे पाणी यामुळे या भागात हिरवळ मोठ्या प्रमाणात आहे. परिसरात रानडुकरांचे प्रमाण वाढले आहे. वाघाला आवश्यक असलेले खाद्य व पाणी तसेच सुरक्षित आश्रयस्थान या भागात असल्याने वाघाचे वास्तव्य व वावर वाढला आहे. वाघाच्या भीतीमुळे जंगलातील रानडुकर स्वत:चे आश्रयस्थान सोडून सैरावैरा पळत आहेत. कुड्याची फुले, झाडूच्या काड्या, सरपण, तेंदूपत्ता आणण्यासाठी गेलेले नागरिक वाघाचे बळी पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या भागात गस्तीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. वाघाला पकडण्यासाठी रवी परिसरात दोन पिंजरे लावले आहेत. १३ ट्रॅपिंग कॅमेरे लावून वाघाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व देसाईगंजचे उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. वाघाला पकडण्यासाठी वन विभाग शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी रात्री मोटारसायकलने फिरू नये, सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ४.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत वातावरणात थंडावा राहत असल्याने वाघ बाहेर निघू शकतो, या कालावधीत नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी क्षेत्र सहायक के. बी. उसेंडी, वनरक्षक एस. के. सय्यद, सतीश गजबे, एस. जी. झोडगे उपस्थित होते.