निस्तार डेपोअभावी नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:48+5:302021-07-07T04:45:48+5:30

कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावांत निस्तार डेपो ...

Citizens suffering due to lack of rescue depot | निस्तार डेपोअभावी नागरिक त्रस्त

निस्तार डेपोअभावी नागरिक त्रस्त

Next

कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावांत निस्तार डेपो देण्याची मागणी हाेत आहे.

खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले

गडचिरोली : रस्त्याच्या कडेला ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो.

आरोग्य धोक्यात

गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाला.

रस्त्यांची दुरवस्था

जाेगीसाखरा : परिसरातील अनेक गावांना जाेडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार निवेदने देऊनही रस्तेदुरूस्ती संदर्भात कार्यवाही होत नाही.

अपघाताचा धाेका

गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने. वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा

गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविली जात होती. आता मात्र या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.

बांधकाम साहित्यामुळे रहदारीस अडथळा

गडचिरोली : शहरात विविध भागात घरांचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळाख आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र, याकडे न. प.चे दुर्लक्ष होत आहे.

दुर्गम भागात कर्मचारी राहातच नाहीत

धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहातच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.

चपराळा येथे सोयीसुविधा पुरवा

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र, याठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे. चपराळा येथे भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढली आहे.

हूक टाकून विजेची चोरी सुरूच

वैरागड : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरातूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे.

उपाहारगृहांमधील पदार्थ उघड्यावर विक्रीला

गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयांतील उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, याकडे अन्न व पुरवठा विभागातर्फे कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

लिलावाअभावी वाहने गंजण्याची शक्यता

गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यांमध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.

पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त

अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत. पशुधन घटल्याने दुग्ध व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

हेमाडपंथी शिवमंदिर जीर्णावस्थेत

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भुयार जात असून, ते भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, असे सांगितले जाते.

योजनांच्या माहितीसाठी केंद्र निर्माण करा

कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनांच्या लाभांपासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.

कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

गडचिरोली : कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कॅम्प एरियात नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी.

गडचिरोली - पेंढरी मार्गावर बसफेऱ्या अत्यल्प

धानोरा : गडचिरोली आगारातून पेंढरी मार्गावर बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांकडून केली जात आहे. गडचिरोलीवरून एटापल्ली - अहेरीकडे जाण्यासाठी गडचिरोली - कारवाफा - पेंढरी हा प्रमुख मार्ग आहे.

गरोदर मातांना बुडीत मजुरी देण्याची मागणी

सिरोंचा : गरोदर मातांना शासनाकडून बुडीत मजुरी दिली जाते. मात्र, जिल्ह्यातील मातांना ही मजुरी देण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. महिला रुग्णालयात चकरा मारत आहेत. ही मजुरी तत्काळ देण्याची मागणी होत आहे. काही महिलांना एक ते दीड वर्षापासून बुडीत मजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे महिला वंचित आहेत.

शहरातील अनेक वॉर्डात सट्टापट्टी जोमात

गडचिरोली : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादाला लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. मात्र, याकडे गडचिरोली पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सट्टापट्टीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी व युवक या व्यवसायात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.

घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला

गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून सळी, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्यांचे भाव प्रचंड वधारले आहेत. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे.

पशु योजनांबाबत जनजागृती करा

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे.

मूल मार्गावरील बसफेऱ्या वाढवा

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक नागरिक मूल, चंद्रपूरला ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरून प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. त्या तुलनेत बसफेऱ्या कमी आहेत. परिणामी नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. आता अनलाॅक झाल्यापासून विवाह साेहळे सुरू झाले आहेत. परिणामी प्रवाशांची संख्या वाढल्याने बसफेऱ्यांची गरज आहे.

अर्धवट पुलावरून खडतर प्रवास

धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. या भागातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापावे लागते.

Web Title: Citizens suffering due to lack of rescue depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.