नागरिकांनाे, शासन आपल्या दारी उपक्रमाचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 05:00 AM2022-05-11T05:00:00+5:302022-05-11T05:00:33+5:30
बऱ्याच सोयी, सवलती व योजना थेट गरजूंपर्यंत पोहोचावे यासाठी आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. नागरिकांनी सुद्धा आपापल्या स्तरावरून जनजागृती करून लाभ घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी यावेळी म्हणाले. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शहीद वीर बाबुराव शेडमाके आणि राज्याचे माजी गृहमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. आर. आर. पाटील यांचे स्मारक या भागात साकारण्यात यावे, असा आशावाद यावेळी व्यक्त केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : शासन आपल्या दारी उपक्रमाचा प्रत्येक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले. स्थानिक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (दि. १०) महाराजस्व अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आमदार धर्मराव बाबा आत्राम, उपविभागीय अधिकारी अंकित गुप्ता, जि. प. च्या माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, तहसीलदार ओंकार ओतारी उपस्थित होते. प्रत्येक योजनांचा लाभ वंचित व गरजूंना मिळावा यासाठी शासन प्रयत्न करीत असते. बऱ्याच सोयी, सवलती व योजना थेट गरजूंपर्यंत पोहोचावे यासाठी आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. नागरिकांनी सुद्धा आपापल्या स्तरावरून जनजागृती करून लाभ घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी यावेळी म्हणाले.
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शहीद वीर बाबुराव शेडमाके आणि राज्याचे माजी गृहमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. आर. आर. पाटील यांचे स्मारक या भागात साकारण्यात यावे, असा आशावाद यावेळी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते असंख्य लाभार्थ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे, दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप, कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत धनादेश वाटप, आयुष्यमान प्रधानमंत्री योजनेचे कार्ड, आरोग्य विभागाचे गोल्डन कार्ड आणि अन्य विविध योजनेचे प्रमाणपत्र यावेळी वितरित करण्यात आले.
यावेळी जि. प. च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, अहेरी उपविभागातील जनतेच्या विकासासाठी शासनासह प्रशासन आपल्या दारी आले आहे. विद्यमान सरकार प्रभावीपणे शासकीय याेजना राबवित आहे. असे असले तरी जनजागृतीअभावी काही नागरिक याेजनांच्या लाभापासून वंचित आहेत. अशा नागरिकांचा शाेध घेऊन प्रशासनाने त्यांना याेजनाचा लाभ द्यावा, जेणेकरून शेवटच्या घटकाचाही विकास हाेईल, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक तहसीलदार ओंकार ओतारी, संचालन मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नायब तहसीलदार फारूख शेख, दिनकर खोत, तालुका पुरवठा अधिकारी शिल्पा दरेकर, रोशन दरडे, ललित लाडे व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
विविध विभागाचे स्टाॅल्स व प्रदर्शन
- नागरिकांना सुलभरीत्या शासकीय याेजनांची माहिती मिळावी यासाठी विविध विभागातर्फे स्टाॅल्स उभारून प्रदर्शनी लावण्यात आली. जिल्हाधिकारी संजय मीना, आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम व अधिकाऱ्यांनी या सर्व स्टॉल्सचे बारकाईने निरीक्षण केले.