शहरातील एटीएम कॅशलेस
By Admin | Published: May 29, 2017 02:18 AM2017-05-29T02:18:15+5:302017-05-29T02:18:15+5:30
रविवारी आठवडी बाजार राहत असल्याने गडचिरोलीकर व तालुक्यातील नागरिकांना रक्कमेची नितांत गरज असते.
ग्राहक परतले : केवळ एकाच बँकेच्या एटीएममध्ये रोकड
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रविवारी आठवडी बाजार राहत असल्याने गडचिरोलीकर व तालुक्यातील नागरिकांना रक्कमेची नितांत गरज असते. मात्र नेमक्या याच दिवशी रविवारला गडचिरोली शहरातील सर्वच राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यतर्वी सहकारी बँकेच्याही एटीएममध्ये रोकड नसल्याने रोकड काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना परत जावे लागले. कॅशलेस एटीएममुळे ग्राहकांची रविवारी प्रचंड पंचाईत झाली.
रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी चामोर्शी मार्गावरील बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्रच्या दोन्ही एटीएममध्ये रोकडचा अभाव होता. एटीएम केंद्राच्या दर्शनी भागावर नो कॅशचा फलक झळकत असल्याचे दिसून आले. चंद्रपूर मार्गावरील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एक एटीएम बंद होते. तर आतील सर्वच एटीएममध्ये रोकड उपलब्ध नव्हती. त्यामुळे रक्कम काढण्यासाठी आलेले अनेक ग्राहक या एटीएम केंद्रातून परत गेले. चंद्रपूर मार्गावर असलेल्या बँक आॅफ इंडियाचे एटीएम रोकड नसल्याने रविवारी बंद होते. युनियन बँक आॅफ इंडियाचे तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे त्रिमूर्ती चौक परिसरातील एटीएम बंद होते. एटीएम बंद असल्यामुळे बाजारात जाणाऱ्या लोकांची ऐनवेळी पंचाईत झाली.