अन् नक्षलवाद्यांनी आपले साहित्य टाकून जंगलात काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 14:39 IST2023-02-11T14:38:59+5:302023-02-11T14:39:59+5:30
छत्तीसगड सीमेवर पाेलिस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक

अन् नक्षलवाद्यांनी आपले साहित्य टाकून जंगलात काढला पळ
गडचिराेली : धानाेरा तालुक्यातील गोडलवाही हद्दीतील छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत बोधीनटोला गावाजवळील जंगल परिसरात पाेलिस व नक्षल यांच्यामध्ये शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता चकमक उडाली. पाेलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी आपले साहित्य तिथेच टाकून जंगलात पळ काढला. ते साहित्य पोलिस पथकाने जप्त केले आहे.
बाेधीनटाेला जंगल परिसरात २० ते २५ नक्षलवादी जमले असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष अभियान पथकाचे जवान या भागात नक्षल विराेधी माेहीम राबवत हाेते. दरम्यान नक्षलवाद्यांनी पाेलिसांच्या दिशेने गाेळीबार केला. पाेलिसांनीही प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.
जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. चकमकीदरम्यान जंगल परिसरात, काही नक्षल पिठ्ठू व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य आढळून आले. या भागात नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. सदर माेहीम अपर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली.